अयोध्येत तिरंगा फडकवत मशिद आणि रुग्णालयाचे काम सुरु
X
एका बाजूला अयोध्येत राममंदीर उभारणीसाठी देशव्यापी निधीसंकलन मोहीम सुरु असताना दुसऱ्या बाजूला काल प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर मशिद आणि रुग्णालयांचे बांधकाम सुरु झाले आहे. ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मंगळवारी अयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीच्या कामाची सुरूवात झाली. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा तोडगा म्हणून अयोध्येत राम मंदिर व बाबरी मशीद उभी करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार अयोध्येपासून २५ किमी अंतरावर धन्नीपूर या गावांत ५ एकर जमिनीवर इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून मशीद बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी मशिदीच्या बांधकामास औपचारिक सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पावणे नऊ वाजता तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख जफर अहमद फारुकी यांनी १२ सदस्यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकावला नंतर वृक्षारोपण करण्यात आले. सध्या या जागेची मृदा तपासणी सुरू असून नकाशा आल्यानंतर वेगाने काम सुरू होईल असे फारुकी यांनी सांगितले. या मशिदीच्या निर्मितीसाठी देणग्यांचेही आवाहन करण्यात आले आहे.
अयोध्येतील धन्नीपूरमध्ये प्रस्तावित मशिदीचे डिझाइन शनिवारी जाहीर झाले. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने व्हर्च्युअल बैठकीत डिझाइन जारी केले. मशिदीला घुमट नसेल. मशिदीचे नाव कोणत्याही बादशहाच्या नावावर ठेवले जाणार नाही, असे ठरले. मशिदीच्या परिसरात संग्रहालय, ग्रंथालय आणि एक कम्युनिटी किचनही तयार केले जाणार आहे. २०० ते ३०० खाटांचे एक रुग्णालयही असेल. संपूर्ण प्रकल्प दोन वर्षांत साकारला जाण्याची अपेक्षा आहे. साइटवर आधी माती परीक्षण केले जाईल. त्यानंतर नकाशा मंजूर केला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर बांधकाम प्रत्यक्षात सुरू होईल. मशिद, रुग्णालय, संग्रहालयाचे काम एकाचवेळी सुरू होईल. रुग्णालयावर १०० कोटी रुपये खर्च येऊ शकतो. ते चार मजली असेल.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे वास्तु विभागाचे अधिष्ठाता व मशिदीचे डिझाइन तयार करणारे एम. एस. अख्तर म्हणाले, मशीद ३५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तयार होईल. येथे एकाच वेळी २ हजार लोक नमाज अदा करू शकतील. मशिदीचे दोन मजले असतील. यात महिलांसाठी स्वतंत्र जागा असेल. इमारती इको-फ्रेंडली असेल आणि त्यात सौर ऊर्जेचाही वापर केला जाईल. रुग्णालयाला २४ हजार १५० चौरस मीटरमध्ये उभारले जाईल. मशीद सहा महिन्यांत तयार होईल आणि रुग्णालयासाठी वर्ष लागू शकते. मशिदीचे नाव कोणत्याही बादशहाच्या नावावर नसेल. रुग्णालयामुळे गरीब रुग्णांवर वेळेवर व दर्जेदार उपचार होऊ शकतील. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना मदत होणार आहे.
मुस्लिम पक्षाला एकूण ५ एकर जमीन देण्यात आली असून, या पाच एकर जमिनीत मशीद, रुग्णालय, संशोधन केंद्राबरोबरच अनेक सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. सुप्रीम कोर्टाने गेल्यावर्षी ९ नोव्हेंबर या दिवशी अयोध्या प्रकरणी निकाल जाहीर करताना वादग्रस्त जागेवर राम मंदिर निर्माण करण्याचे आदेश दिले. तसेच, मुस्लिम पक्षाला मंदिर निर्मितीसाठी अयोध्येत दुसऱ्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.