औरंगाबादकरांना लस घेतली तरच मिळणार पेट्रोल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
X
औरंगाबाद जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात असे आदेश जारी केले आहे. यामुळे आता नागरिकांना लसीकरण करणं गरजेचं ठरणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून, राज्यामध्ये लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा हा 26 व्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आता लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून, आता यापुढे आहेत.सर्व पेट्रोल पंप धारक, सर्व गॅस एजन्सी धारक,रास्त भाव दुकानदार, कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी सेवा देतांना लसीकरण केल्याची संबंधित व्यक्तींची खात्री करावी असे आदेश दिले असून ह्या आदेशाची अंमलबजावणी 10 नोव्हेंबर, 2021 पासून सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण खूप कमी झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील उपाययोजनांची आढावा बैठक 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्ह्यातील लसीकरण बाबत माहिती दिली होती. तर कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनापंतप्रधान मोदी यांनी दिल्या होत्या.