औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पेटला, 'स्मार्ट सिटीचे कॅम्पेनिंग ठरला वादाचा केंद्रबिंदू'
X
औरंगाबाद जिल्हाच्या नामकरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून, याला कारण ठरलं आहे औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे सुरू असलेले स्मार्ट सिटीचे कॅम्पेनिंग. स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंगमध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा या वादाला सुरुवात झाली आहे.
शहरात येणाऱ्या प्रत्येकाला शहराचा आकर्षण असावं म्हणून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात खडकी, औरंगाबाद, प्रतिष्ठानचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहे. त्यात आता शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ "सुपर संभाजीनगर" असा फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे पून्हा औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या चर्चेला वेग आला आहे.
'लव्ह औरंगाबाद' फलकाची तोडफोड
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील छावणी परिसरात लव्ह औरंगाबाद हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे.तर इतर ठिकाणी लावलेल्या फलकाची सुद्धा पोलिसांनी आढावा घेतला असून, काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळाला.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून राजकारण- जलील
पाणी, स्वच्छता, रस्ते आणि रोजगार या विषयाबद्दल भाजप आणि शिवसेना काही बोलत नाहीत. मात्र दर पाच वर्षांनी शिवसेना आणि भाजप हा विषय पुढे आणतात, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादमध्य शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. या काळात महापालिकेने शहरासाठी केलेले काम दाखवण्यासाठी नसल्यामुळं ते शहराच्या नावाचे राजकारण करत असल्याची टीका ही जलील यांनी केली.