औरंगाबाद: लेबर कॉलनीत सोमवारी जेसीबी धडकणार;प्रशासनाच्या कारवाईकडे औरंगाबादकरांचे लक्ष
X
जिल्हाधिकारी शेजारील विश्वास नगर, लेबर कॉलनीतील (Aurangabad Labor colony) 20 एकर जागेवरील शासकीय इमारीत 70 वर्षे जुन्या व धोकादायक असल्याचे कारण देत प्रशासनाकडून 08 नोव्हेंबरपासून या इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. लेबर कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी आठ नोव्हेंबरपर्यंत घराचा ताबा सोडावा, अशी नोटीस प्रशासनाने यापूर्वीच बजावली आहे. त्यामुळे उद्यापासून लेबर कॉलनीतील घरे पाडण्याची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सोमवारी कारवाई होण्याच्या भीतीने येथील नागरिक धास्तावले आहेत.
ही सरकारी जागा असून, यात अनेक जण अवैध प्रकारे राहत आहेत. या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, ते राहण्यायोग्य नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कारवाई होत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हंटले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिशाभूल करून कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप
याप्रकरणी स्थानिक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करत प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. विशेषतः भाजप आणि एमआयएमनेदेखील नागरिकांच्या बाजूने भूमिका घेत प्रशासनाच्या कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या कारवाईवर संपूर्ण औरंगाबाकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी आपल्या भुमिकेवर ठाम
राजकीय हस्तक्षेप होताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाहीबाबत आणि शासकीय भुमिकेबाबत माहिती दिली. तर याचवेळी निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू. मात्र, ही मोहीम होणारच या भुमिकेवर जिल्हाधिकारी ठाम असल्याचे बोलले जात आहे.