विधान भवनाच्या गेटजवळ महिलेने रॉकेल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न
X
मुंबई : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसरा दिवशी विधान भवनाच्या गेटजवळ एका महिलेने रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घटनास्थळी असलेल्या महिला पोलिसांनी संबंधित महिलेला वेळीच अडवले. यावेळी महिलेने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तिने नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या नव्या नियमांना कंटाळून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. संबंधित महिला ही युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष असून राजलक्ष्मी पिल्ले असं त्यांचं नाव आहे. पोलिसांनी त्यांना आत्मदहन करण्यापासून अडवले. यावेळी त्यांनी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यावर जोरदार टीका केली. "स्वतःला सक्षम बोलणारे दीपक पांडेय सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे शेवटी हतबल ठरले आहेत", अशी टीका पिल्ले यांनी केली.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे पुतणे सराईत गुन्हेगार अजय बागुल हे सत्ताधारी पक्षात आहेत. त्यामुळे नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून त्यांना वारंवार वाचवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आपण हे टोकाचे पाऊलं उचलले असल्याचे राजलक्ष्मी पिल्ले यांनी सांगितले.
काही आरोपींनी पिल्ले दाम्पत्यांची गाडी अडवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत पोलिसांकडून फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असा दावा पिल्ले यांनी केला आहे. सोबतच अजय बागुल आणि त्याच्या साथीदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासन हतबल असल्याचं त्यांनी म्हटले आहे.