AK-56 रायफलसाठी प्राध्यापकाचे पंतप्रधान मोदींना पत्र
पंतप्रधान मोदी यांना थेट पत्र लिहून AK-56 रायफलची मागणी एका प्राध्यापकाने केली आहे....देशात वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करणाऱ्या प्राध्यापकाचे म्हणणे आहे तरी काय?
X
देशात विशिष्ट विचारधारेविरुध्द भुमिका मांडल्याने झुंडीने हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर दिल्ली विद्यापीठातील काँग्रेसच्या प्राध्यापकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून AK-56 या रायफलची मागणी केली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या हिदू कॉलेजमध्ये इतिहास विषय शिकवणाऱ्या रतन लाल नावाच्या प्राध्यापकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या व आपल्या परिवाराच्या संरक्षणासाठी AK-56 या रायफलची मागणी केली आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजच्या प्राध्यापक रतन लाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मी दलित समाजातील असून मी इतिहास विषय शिकवतो. तसेच पीएचडीसाठी मी राष्ट्रवादी इतिहासकार काशीप्रसाद जायसवाल यांचे योगदान यावर संशोधन करून काही पुस्तकं प्रकाशित केली आहेत. तसेच शिकणे आणि शिकवण्याव्यतिरिक्त मी सामाजिक कार्यातही सहभागी होत असतो. ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. त्याबरोबरच मी टीव्ही चॅनल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझी भुमिका मांडत असतो. ज्यामध्ये आंबेडकरनामासारखे प्रमुख चॅनल आहेत.
अकादमिक विश्वाशी जोडला गेलो असल्यामुळे सरकार आणि सामाजिक घटनांची समिक्षा करणे आणि त्यावर टीका टिपण्णी करणे माझे काम आहे. त्यामुळे मी अनेकदा आपल्या सरकारच्या धोरणांवरही टीका केली आहे. तर अशाच प्रकारे मी यापुर्वीच्या युपीए सरकारच्या काळातील धोरणांवरही मी सडकून टीका केली आहे. मात्र या दोन्ही सरकारमध्ये काही अंतर आहे. आपल्या सरकारच्या धोरणांवर आणि सामाजिक धार्मिक विषयावर भाष्य केल्याने मला काही असामाजिक तत्वांकडून धमक्या येण्यास सुरूवात झाली आहे. तर हे प्रकरण माझी हत्या करण्याच्या धमक्यांपर्यंत पोहचले आहे.
या सर्व प्रकाराबद्दल एक दिवस मी मौरिसनगर पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. तर जेव्हा मला अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या त्यावेळी मी या प्रकाराला गंभीरतेने घेतले नव्हते. मात्र नुकतेच लखनऊ विश्वविद्यापीठाचे प्राध्यापक रवी कांत जो दलित समाजातील आहेत. त्यांच्यावर असामाजिक घटनांकडून आणि कथित विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे मला हे पत्र लिहीणे आवश्यक वाटले.
पुढे प्राध्यापक रतन लाल म्हणाले की, मला तुमची एक गोष्ट आठवत आहे. ज्य़ा भाषणात तुम्ही म्हणाले होता की, गोली मारनी है तो मुझे मार दो, मेरे दलित भाईयों पर हमले मत करना. परंतू तुम्ही सांगितलेली गोष्टच तुमचे समर्थक गंभीरपणे घेत नाहीत, असे दिसून येत आहे. कारण तुम्ही इतकं गंभीर वक्तव्य केल्यानंतरही दलितांवर हल्ले सुरूच आहेत.
तसेच रतन लाल पुढे म्हणाले की, मी सुध्दा तुमच्याप्रमाणे भारताला युध्दाच्या नाही तर बुध्दाच्या मार्गावर चालताना पाहू इच्छितो. त्यामुळे माननिय पंतप्रधान महोदय तुम्हीसुध्दा हे स्वीकार कराल की, स्वसंरक्षण करणे हा देशातील प्रत्येकाला नैसर्गिक अधिकार आपल्या देशाचे संविधान देते. त्यामुळे हल्लेखोर कमी संख्येने असतील तर लाकडी दंडूक्याने त्यांचा मुकाबला करता येईल. मात्र हेच हल्लेखोर मोठ्या झुंडीने आले तर त्यावेळी कोणत्याही हत्याराविना त्या हल्लेखोरांचा सामना करून स्वसंरक्षण करणे कठीण आहे. त्यामुळे यावर योग्य विचार करून उपाययोजना कराव्यात.
मी तुम्हाला आग्रह करतो की, मला AK-56 सह दोन अंगरक्षक देण्यात यावेत. किंवा हे शक्य नसल्यास मला AK-56 रायफचे लायसंस देण्यात यावे. ज्यामुळे झुंडीने माझ्यावर हल्ल्याची घटना घडली तर माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवाचे रक्षण करणे शक्य होईल. मात्र हे शस्र विकत घेणे माझ्यासारख्या शिक्षकी पेशाच्या नागरिकाला परवडणारे नाही. त्यामुळे माझी आपणांस विनंती आहे की, मला हे लायसन्स देण्याच्या प्रक्रीयेला लवकरात लवकर सुरूवात करण्यात यावी. ज्यायोगे मी माझ्या शोषित आणि वंचित समाजातून एक-दोन रुपयांचा सहयोग घेऊन या शस्राच्या किंमतीचे नियोजन करू शकेल. तसेच या शस्रासोबतच मला कमांडो प्रशिक्षणही देण्यात यावे. मी आपणांस निराश करू शकत नाही. त्यामुळे मला पुर्ण विश्वास आहे की, तुम्ही या पत्राचा भाव गंभीरतेने समजून घ्याल, असे पत्र प्राध्यापक रतन लाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले आहे.