रोहयो मंत्री संदीपान भुमरेंच्या माध्यामतून पूरग्रस्तांना मदत
X
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड,रत्नागिरी ,सांगली,कोल्हापूर भागात सर्वाधिक फटका बसला आहे. यात मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली असून, शेकडो कुटुंब रस्त्यावर आली आहे. त्यामुळे राज्यच नव्हे तर देशभरातून पूरग्रस्तांच्या मदतीला अनेक संघटना,राजकीय पक्ष, खाजगी संस्था, कंपन्या धावून येत आहे. अशीच काही मदत राज्याचे रोजगार हमी-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या माध्यामतून करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून अन्नधान्य आणि इतर वस्तूची भरलेली गाडी आज पैठण येथून रवाना झाली. ज्यात गहू, तांदूळ, हरबरा डाळ, तेलाचे बॉक्स, गूळ, पोहे, रवा, बिस्कीटच्या पुड्यांचा समावेश आहे. तसेच या भागातील लवकरच आपण आढावा घेणार असून, पूरग्रस्तांना आणखी लागणारी मदत पुरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भुमरे म्हणाले.
कार्यकर्त्यांना केलं मदतीच आवाहन
कोल्हापूर प्रमाणेच इतर नुकसानग्रस्त भागात सुद्धा होईल तेवढी मदत पोहचवण्यासाठी भुमरे यांनी मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. तसेच यासाठी लवकरच आपण बैठक घेणार असून,होईल तेवढी मदत नुकसानग्रस्त भागात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा मंत्री भुमरे म्हणाले.