हमाल बांधवांना हेल्थ कार्डचे वाटप
पैशाच्या मोबदल्यात ओझे वाहणारा हमाल कायम दुर्लक्षित घटक असतो. त्यामुळे हमालांच्या आरोग्यासाठी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि श्रमिक कार्डचे वाटप करण्यात आले.
X
पैश्याच्या मोबदल्यात डोक्यावरून किंवा पाठीवरून ओझे वाहून नेणारा हमाल हा आपल्या समाजातील अत्यंत उपेक्षित व दुर्लक्षित घटक आहे. अंगावर लाल डगला व छातीवर बिल्ला लावून अहोरात्र शारीरिक कष्ट करत तो आपला उदरनिर्वाह करतो. स्वाभिमानाने जीवन जगतो. याचीच जाण ठेवून दुर्बल घटकाचे सक्षमीकरण व्हावे म्हणून अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने हा अत्यंत गरजेचं उपक्रम राबिवला. हमाल बांधवामध्ये या शिबिरादरम्यान प्रचंड उत्साह आणि प्रसन्नता दिसून आली.चैर्मन अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते,"समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत विनामूल्य सेवा/सुविधा पोहचवणे हेच फौंडेशनचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती फौंडेशनकडून देण्यात आली.
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथील विश्रांतीगृह येथे शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरांतर्गत हमालांना विनामुल्य आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि श्रमिक कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय चित्रपट सेनेचे संदीप घुगे, प्रसिध्द अभिनेत्री दिपीका चितलिया आणि आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री दिपीका चितलिया यांच्या हस्ते हमालांसाठी वॉटर कुलर भेट देण्यात आला. तसेच आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते हमालांना श्रमिक कार्ड आणि हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.