भाजप लोकांच्या दबावामुळे अन्वय नाईकने आत्महत्या केली - संजय राऊत
X
``कोण आहे किरीट सोमय्या? सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही,`` असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. आता या वादात नारायण राणे यांनी सुद्धा उडी घेतली होती.त्यांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर टिका केली होती.त्यानंतर किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी सोमय्या कोर्लईला जाणार आहेत. त्यावरूनही संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवला.
कोण आहे किरीट सोमय्या?
सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे? बंगले शोधणार आणि घरे शोधणार, असा सवाल करतानाच भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांनाही स्वप्नात बंगले दिसत आहेत, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना आज पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला.
यावेळी राऊत यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरूनही सोमय्यांवर गंभीर आरोप केले. राऊत यांनी नाईक यांच्या आत्महत्येला सोमय्याच जबाबदार असल्याचं सांगितलं. तसेच सोमय्यांनी नाईक यांना आत्महत्या करण्यापूर्वी धमक्या दिल्या होत्या असा दावा त्यांनी केला. अर्णवकडे पैसे मागायचे नाही. त्याला बिल मागायचे नाही, अशी धमकी सोमय्यांनी नाईकला दिली होती. माझ्याकडे नव्याने माहिती आली आहे. दोनवेळा सोमय्याने अन्वय नाईकला बोलावून धमकी दिली होती. त्यानंतर नाईक यांनी आत्महत्या केली. या धमक्यानंतरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. भाजपच्या लोकांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले हा मोठा गुन्हा आहे. या लोकांना मराठी माणसाला बदनाम करायचं आहे. हे सर्व नाईकचे हत्यारे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.