Home > News Update > अंबानी स्फोटकं प्रकरण : परमबीर सिंहांनी सायबर तज्ज्ञाला 5 लाख दिल्याचा आरोप

अंबानी स्फोटकं प्रकरण : परमबीर सिंहांनी सायबर तज्ज्ञाला 5 लाख दिल्याचा आरोप

अंबानी स्फोटकं प्रकरण : परमबीर सिंहांनी सायबर तज्ज्ञाला 5 लाख दिल्याचा आरोप
X

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापुढे सापडलेल्या स्फोटकं भरलेल्या कार प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIAने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातील एका उल्लेखामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एवढेच नाही तर या प्रकरणात परमबीर सिंह यांचा सहभाग असण्याचीही शक्यता आता पुढे आली आहे. विशेष म्हणजे हा उल्लेख NIAच्या आरोपपत्रात आल्याने परमबीर सिंह आता मोठ्या अडचणीत आले आहेत.

25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घरापुढे स्फोटकं सापडली होती. ही स्फोटकं एका कारमध्ये आढळली होती. टेलिग्राम चॅनेलवर जैश-उल-हिंद(Jaish Ul Hind) या संघटनेने या प्रकरणाची जबाबदारी घेतली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास मार्चमध्ये NIA ने हाती घेतला होता. या पत्रासंदर्भात जो अहवाल सादर केला गेला होता, तो अहवाल सादर करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर एक्सपर्टने याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

या सायबर एक्स्पर्टने NIAला माहिती दिली आहे की, 9 मार्च रोजी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात आपली परमबीर यांच्यासोबत भेट झाली होती. या भेटी दरम्यान आपण दिल्ली पोलिसांसोबत इस्त्राईलच्या दुतावासासमोरील बॉम्बस्फोटाच्या तपासात सहकार्य केल्याचे सांगितले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी असाच एक अहवाल अँटालिया स्फोटकं प्रकरणी तयार करुन देण्यास सांगितले. पण हे काम आपल्या अखत्यारित येत नाही, असे आपण परमबीर सिंह यांना सांगितले तरी त्यांनी असा अहवाल तयार करुन देण्याचा आग्रह केला. हा रिपोर्ट तयार केल्यानंतर परमबीर सिंह यांनी त्यामध्ये Jaish Ul Hind च्या टेलिग्राम चॅलेनवरील पोस्टरही या रिपोर्टमध्ये एड करण्यास सांगितले.

NIAच्या महासंचालकांशी थोड्याच वेळात भेट आहे, त्यामुळे रिपोर्ट लगेच करुन देण्यास त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी Jaish Ul Hindच्या मेसेजमधील पोस्टर वापरुन अहवाल अपडेट करुन मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत इ मेल आयडीवर पाठवला. पण Jaish Ul Hindचे जे टेलिग्राम चॅनेल मी शोधले होते ते पोस्टर असलेल्या टेलिग्राम चॅनेलपेक्षा वेगळे होते, असेही या सायबर एक्स्पर्टने सांगितले आहे.

तसेच त्याने शोधलेल्या टेलिग्राम चॅनेलवर अँटालिया स्फोटकं प्रकऱणी कोणतेही पोस्टर देखील नव्हते. एवढेच नाही तर परमबीर सिंह यांनी या कामाचे आपल्याला रोख 5 लाख रुपये देखील दिले, असा आरोपही या सायबर तज्ज्ञाने केला आहे.

याप्रकरणी NIAने या सायबर एक्स्पर्टला पैसे देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार आधी परमबीर सिंह यांनी 3 लाख रुपये देऊ केले, पण या सायबर एक्स्पर्टने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी रक्कम 5 लाखांपर्यत वाढवल्याचे आपल्या जबाबामध्ये सांगितले आहे. हे पैसे मुंबई पोलिसांच्या ss फंडातून दिल्याचेही या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या जबाबामध्ये सांगितले आहे.

अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सरकारने परमबीर सिंह यांची बदली केली आहे. त्यामुळे आता NIA परमसिंह यांचीही चौकशी करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Updated : 8 Sept 2021 6:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top