दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी 'लेटर टू डेअरी मिनिस्टर' आंदोलनाची घोषणा
X
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची विस्तारित ऑनलाइन बैठक नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी 'लेटर टू डेअरी मिनिस्टर' आंदोलनाची घोषणा करण्यात आली
अहमदनगर- दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची विस्तारित ऑनलाइन बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर दिनांक 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना हजारो पत्र पाठवण्याचे आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
'लेटर टू डेअरी मिनिस्टर' या मोहीमे अंतर्गत दूध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी जमलेले शेतकरी एकत्र बसून हे पत्र लिहितील व दुग्धविकास मंत्र्यांना पाठवतील. दुग्ध विकास मंत्र्यांनी आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देतील. नुकत्याच झालेल्या या बैठकीत अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व गुजरात येथील ज्येष्ठ शेतकरी नेते दायाभाई गजेरा यांचे मार्गदर्शन लाभले. उमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला तसेच आगामी वाटचालीसाठी करावयाच्या कार्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.