Anil Parab Vs Kirit Somaiyya : बंगला पाडून दाखवा, अनिल परब यांचे किरीट सोमय्या यांना ओपन चॅलेंज
अनिल परब यांचा दापोली येथील अनधिकृत बंगला पाडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्या यांना अनिल परब यांनी बंगला पाडून दाखवा म्हणत ओपन चॅलेंज दिले आहे.
X
भाजप नेते किरीट सोमय्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर किरीट सोमय्या आज मुंलुंड येथून प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोली येथील अनिल परब यांचा अनधिकृत बंगला तोडण्यासाठी निघाले होते. त्यावरून मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना बंगला पाडून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत दापोली येथे अनिल परब यांनी समुद्रकिणारी बांधलेले रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत चौकशी केल्यानंतर हा बंगला अनधिकृत असल्याचे आढळून आले होते. त्यावरून किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेऊन रिसॉर्ट तोडण्याची मागणी करत दापोलीच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी सोमय्यांना कशेडी घाटात अडवले. त्यानंतर अनिल परब यांनी सोमय्या यांनी बंगला पाडून दाखवा, असे आव्हान दिले आहे.
अनिल परब म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे, असेही परब म्हणाले. तसेच किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. त्याबरोबरच सोमय्या यांच्यामुळे जे रोजगार करणारे आहेत ते लोक भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे, असेही परबांनी सांगितले आहे.