सचिन वाझेंना अनिल देशमुखांकडून महिन्याला 100 कोटी वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंग यांचा गंभीर आरोप.. अनिल देशमुख म्हणाले..
X
सचिन वाझे प्रकरणात राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिस आयुक्त पदी असणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या बदल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात अनेक थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान परमबीर सिंग यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असतानापरमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी केली आहे.