सरपंचाच्या मनमानीला कंटाळून महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे...
X
संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात मालदाड गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले. आणि यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत सरपंचाच्या विरोधात घोषणाबाजी करत सरपंचाचा निषेध केला आहे. मालदाड गावांमध्ये शाळेचे बांधकाम करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
परंतु सहा महिने उलटूनही सरपंच ना हरकत दाखला देत नव्हते त्यामुळे अखेर मालदाड गावचे ग्रामस्थ एकत्र झाले आणि त्यांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माधव गिरी, ग्रामपंचायत सदस्य अमित नवले, नवनाथ नवले, अनिल नवले, सौ पूनम नवले यांची भाषणे झाली. यावेळी ग्रामसेवक काळे यांनी सरपंच यांना मोबाईल वरून संपर्क केला असता मी बाहेर असल्याचे सरपंच यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलन करते अधिकच आक्रमक झाले.
त्यानंतर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत सरपंचाच्या मनमानी कारभारा विरोधात निषेध व्यक्त केला. या आंदोलनामध्ये मालदाड ग्रामपंचायत सदस्य सौ . अश्विनी नवले, सौ. सुनिता नवले, श्री. परसराम गोफने, श्री.अमित साहेबराव नवले, मालदाड सोसायटीची चेअरमन श्री. रावसाहेब नवले , व्हा. चेअरमन श्री. प्रशांत नवले, कानिफनाथ पतसंस्थेचे चेअरमन सौ . जयश्री नवले, व्हा. चेअरमन सौ. अर्चना नवले, मालदाड सोसायटी व कानिफनाथ पतसंस्थेचे सर्व संचालक व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.