महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून पुण्यात आंदोलन ; सामूहिक बलात्काराच्या घटनेचा केला निषेध
X
पुण्य नगरी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात मागील 10 दिवसात सामुहिक बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्याने या विरोधात डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीच्यावतीने आंदोलन करत या घटनांचा निषेध करण्यात आला.
पुणे येथील जनता वसाहतीमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती, त्यानंतर काल वानवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची चीड आणणारी घटना घडली. त्यामुळे पुण्य नगरी अशी ओळख असलेल्या पुण्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा सवाल करत डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीच्यावतीने आज आंदोलन करण्यात आलं.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराकडे आणि रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेसंदर्भात संबंधीत यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय लोक स्टेशनवर आले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
सोबतच पुण्यात वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊलं उचलावित अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना महिलांनी पुण्यात वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे मुलींना घरातून पाठवण्यास भीती वाटत असल्याची भावना व्यक्त केली.