भाजप नेत्याने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये अपघात, उधळलेल्या बैलांची प्रेक्षकांना धडक
X
रायगड : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात बैलगाडा शर्यतींना सुरूवात झाली आहे. राज्यात आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येऊ लागलं आहे. रायगडमध्येबी बुधवारी एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली आहे. राज्य सरकारनें बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर आता जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जातेय, मात्र या दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त ही बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आली होती. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, काँग्रेसचे नेते राजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थित करण्यात आले होते. याच स्पर्धेदरम्यान आणखी एका बैलगाडीचे बैल उधळले व सैरावैरा पळू लागल्याने बैलगाडी मालक जखमी झाला. या घटनेमुळे बैलगाडा स्पर्धेच्या आय़ोजनात प्रेक्षक आणि बैलगाडा मालक यांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.