पाकिस्तानचं तालिबान प्रेम, सार्क देशाची बैठक रद्द...
X
न्यूयॉर्कमध्ये दक्षिण सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनाच्या वेळी या आठवड्यात ही बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठक रद्द करण्याचे कारण तालिबान आहे. कारण तालिबानने सार्कच्या बैठकीत अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करावे अशी पाकिस्तानची इच्छा होती. मात्र, बैठक रद्द झाल्याने पाकिस्तानच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, माध्यमांनी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान मागील अशरफ गनी सरकारच्या प्रतिनिधींच्या सहभागाच्या विरोधात होता. मात्र, यावेळेला तालिबानचा प्रतिनिधीही बैठकीचा भाग असावा, असा प्रस्ताव पाकिस्तानने पाठवल्याचं समजतंय. मात्र, उर्वरित सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.
तालिबानच्या नवीन राजवटीला जगभरातील सरकारांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळं या वृत्तांमध्ये तथ्य असल्याचं दिसून येतं. दरम्यान, तालिबानने यासाठी संयुक्त राष्ट्रांशी कोणताही संपर्क केलेला नाही. मात्र, हे लक्षात घेण्यासारखं आहे की, तालिबान सरकारच्या मंत्रिमंडळात असे लोक आहेत ज्यांचा जगभरातील दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे.
दरम्यान पाकिस्तान ने दिलेल्या प्रस्तावावर भारतासह इतर काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, बैठकीदरम्यान अफगाणिस्तानची एक खुर्ची रिक्त ठेवण्याबाबत बहुतेक सदस्यांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, पाकिस्तान या सदस्यांच्या मतांशी सहमत नाही. आणि यामुळेच, सार्क परराष्ट्र मंत्र्यांची बैठक एकमत नसल्यामुळे रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तानचं तालिबानवरील हे प्रेम आश्चर्यकारक नाही. कारण, अफगाणिस्तानातील तालिबानला पाकिस्तान खुलेआम पाठिंबा देत आहे. तसेच, तालिबानला अफगाणिस्तानात परतण्यास पाकिस्तानने मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काबूलला 'गुलामगिरीची साखळी तोडणारा' निर्णय असं म्हंटल होतं. मात्र, इम्रान खान यांनी ज्या गोष्टीची प्रशंसा केली आहे. ती तीच कट्टरपंथी पद्धत आहे. ज्यामध्ये शिक्षण, नोकरी आणि लग्नाच्या बाबतीत विशेषतः महिलांना नागरी अधिकार नाकारले जातात.
दरम्यान, नेपाळ कडे या सार्क बैठकीचे यजमान पद होते. ही बैठक दरवर्षी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वेळी होते. 'द इंडियन एक्सप्रेस' च्या रिपोर्टनुसार, नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी सार्क सचिवालयात एक पत्र पाठवलं आहे, ज्यात असं म्हंटल गेलं आहे की, सध्या सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती नसल्यामुळे 76 व्या सत्राच्या वेळी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेची प्रस्तावित सार्क मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही.
काय आहे सार्क? What is SARC
सार्क ही दक्षिण आशियातील आठ देशांची - बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांची संस्था आहे.