अमरिंदर सिंह नरेंद्र मोदी भेट, काय झालं भेटीत?
X
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले असून या कायद्या संदर्भात पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि संताप असल्याचं सांगत, हे कायदे त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे.
तीन कृषी कायद्या संदर्भात कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी मोदींना दोन पत्र दिली. पहिल्या पत्रात पंजाबमधील शेतकर्यांमध्ये कृषी कायद्यांविरोधात प्रचंड असंतोष आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून हे कृषी कायदे मागे घ्यावेत. जर हे आंदोलन जास्त काळ चालू राहिलं तर देशद्रोही शक्ती त्याचा फायदा घेण्याचा धोका आहे. आंदोलनात आतापर्यंत 400 हून अधिक शेतकरी मरण पावले आहेत.
गेल्या वर्षी संसदेने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शेतकरी बांधव हे कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. सध्या राजधानी दिल्लीला लागून उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.
शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. मोदी सरकारच्या मते... केंद्र सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार असल्याचं सांगत आहे. कायद्यांमध्ये सुधारणाही होऊ शकते, परंतु हे कायदे कोणत्याही किंमतीत मागे घेतले जाणार नाहीत. तर शेतकर्यांचं म्हणण आहे की, कृषी कायदे सरसकट मागे घ्यावेत.
त्यामुळं आता सरकार कायदे परत घेतं की शेतकरी तीन कायद्यांमधील बदलांबाबत काय निर्णय घेतात. हे पाहणं महत्त्वाचं आहे.