घणसोली येथील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा ; दोन किलो सोन्याचे, तर 25 किलो चांदीचे दागिने लुटले
X
नवी मुंबई : नवी मुंबईमधील घणसोली येथील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना रविवारी (14 नोव्हेंबर) दुपारी घडली होती. यात सुमारे दोन किलो सोन्याचे, तर 25 किलो चांदीचे दागिने लुटून नेण्यात आले होते. घणसोली सेक्टर 7 येथील अंबिका ज्वेलर्समध्ये तीन व्यक्तींनी प्रवेश करुन पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकला होता.
मात्र, तीन दिवस उलटून सुद्धा पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी सोने-चांदी असलेली बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
ज्वेलर्सचे मालक आणि एक कामगार असे दोघेच दुकानात असताना तीन व्यक्ती ग्राहक बनून दुकानात आले त्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर बंद करुन पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवला. ज्वेलर्सचे मालक आणि कामगार याना दुकानातीलच एका खोलीत हातपाय बांधून डांबून ठेवले. त्यानंतर दुकानातील संपूर्ण ऐवज लुटून तिघांनीही पोबारा केला.
केवळ दहा ते पंधरा मिनिटांत त्यांनी संपूर्ण ज्वेलर्सचे लुटून नेले. जाताना त्यांनी शटर बंद केले होते. यादरम्यान, आतमध्ये डांबून ठेवलेल्या ज्वेलर्स मालक आणि कामगारांनी काही वेळाने एकमेकांच्या मदतीने स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर दुकानाबाहेर येऊन त्यांनी दरोडा पडल्याची माहिती दिली.