अजित पवारांचे सूर बदलले, महायुतीत रमलेही
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी लगेच महायुतीच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरूवात केली. ऐन पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधीच अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आणि महायुतीत रमले देखील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विधानसभेत त्यांच्या सरकारनं केलेल्या विविध विकासकामांची, योजनांची माहिती देत होते. वेगवान निर्णय, गतिमान अंमलबजावणी म्हणून शिंदे सरकारची ओळख कशी आहे, हे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी ही योजना यशस्वी झाली असून कमी दिवसांमध्ये १ कोटी पेक्षा अधिक नागरिकांना या योजनेचा फायदा झालाय. पूर्वी नागरिकांना कामांसाठी हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, आता चित्र वेगळं आहे. आता शासनचं नागरिकांच्या घरापर्यंत योजना घेऊन गेलंय. त्यामुळं आता कामासाठी नागरिकांना पुर्वीसारखे हेलपाटे मारावे लागत नाहीत. मुख्यमंत्री शिंदे बोलत असतांना त्यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फडणवीसांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. त्याचवेळी एका सदस्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पूर्वी हेलपाटे मारावे लागत होते, आता मारावे लागत नाही, याबाबत विचारलं, ते म्हणाले, दादा, हे खरं आहे का ? त्यावर एका क्षणात अजित पवार खुर्चीवरून उठले आणि माईक पुढे करत म्हणाले, “ होय हे खरं आहे...त्यानंतर सत्तापक्षातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही सदस्यांनी बाके वाजवून अजित पवारांच्या वक्तव्याला दाद दिली.