अजित पवारांनी नितिन गडकरींवर लिहिलेला लेख...
अजित पवारांनी नितिन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त लिहिला लेख, लेखात गडकरींचं तोंडभरून कौतुक... अजित पवारांच्या लेखाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा. अजित पवारांच्या लेखाचा नक्की अर्थ काय? अजित पवारांनी हा लेख का लिहिला असेल? या लेखाचा राजकीय अर्थ काय? नक्की वाचा
X
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या सडतोड भूमिकांनी ओळखले जातात. त्यांच्या या भूमिकांचं विरोधकही कौतुक करतात. गडकरींचा 27 मे ला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त गडकरी यांना आत्तापासूनच अनेक लोकांच्या शुभेच्छा आल्या असतील. मात्र, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं थेट लेख लिहून कौतुक केलेलं कधी तुम्ही पाहिले आहे का? आता तुम्ही विचार करत असाल हा लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिला असेल. कारण गडकरी आणि शरद पवार यांचे संबंध अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत.
मात्र, हा लेख मोठ्या पवारांनी लिहिलेला नाही. तर हा लेख राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लिहिला आहे. आता अजित पवार गडकरी यांचं तोंडभरून कौतुक करणारा लेख लिहितात म्हटल्यावर चर्चा तर होणारच. अजित पवार यांनी लिहिलेल्या लेखात ते गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देताच त्याचबरोबर गडकरींचं तोंडभरून कौतुकही करतात. या शुभेच्छा लेखामध्ये अजित पवार यांनी गडकरी यांची कोरोना काळात महाराष्ट्राला कशी मदत झाली? यासह गडकरी यांनी अनावश्यक प्रसिद्धीबाबत देवेंद्र फडणवीस यांना कानपिचक्या दिलेल्या प्रसंगाचे देखील वर्णन केलं आहे. अजित पवार यांनी सामाजिक जीवनात प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारा नेता असं गडकरी यांचं या लेखात वर्णन केलं आहे.
दरम्यान अजित पवार यांनी गडकरी यांचं तोंड भरून कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या लेखाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या लेखाचे वेगवेगळे अर्थ देखील लावले जात आहेत.
काय आहे लेख?
कृतीशील, सुसंस्कृत नेतृत्वं
आपल्या धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. सन्माननीय गडकरीसाहेब हे केवळ राजकारणी, समाजकारणी नाहीत तर ते उत्तम उद्योजक, प्रयोगशील शेतकरी आहेत.
सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात गडकरीसाहेबांचा अव्वल क्रमांक लागतो. कोरोना संकटाच्या काळात कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने शक्य ती मदत करत आहेत, त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.
पक्षीय भेद, विचारधारा जरी भिन्न असल्या तरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवारसाहेबांनी हे संस्कार आपल्या कृतीतून महाराष्ट्रात रुजवले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत. तोच खरा महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे, त्याला अहंकाराचा, खुनशीपणाचा वास नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर भिन्न विचार सरणीच्या डाव्या विचारांच्या ज्येष्ठ नेते ए.बी.बर्धन साहेबांचे त्यांच्या कार्यालयात जावून आशिर्वाद घेणारे, शेती, उद्योग आणि विकासाच्या प्रश्नांवर आदरणीय पवार साहेबांचा सल्ला खुलेपणाने स्वीकारणारे सन्माननीय नितीन गडकरी साहेब मला वेगळे वाटत नाहीत. त्यांच्यातही तो महाराष्ट्राच्या मातीतला संस्काराचा गुण आहे.
सन्माननीय गडकरीसाहेब आता जरी केंद्रात काम करत असले तरी राज्याच्या विधीमंडळात सहकारी म्हणून अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. त्यातही सत्तेत आणि विरोधी पक्षात अशा दोन्ही भूमीकांतून आम्ही कायमच एकमेकांसमोर उभे होतो. त्यांच्या आणि आमच्या पक्षाच्या वैचारीक भूमीका भिन्न होत्या. मात्र, सत्तेत असताना अहंकार आणि विरोधी पक्षात असताना एकारलेपणा, अक्रस्ताळेपणा मला त्यांच्यात कधीही जाणवला नाही. त्यामुळे कायम एकमेकांविरोधात असूनही आमच्यात कायमच स्नेह राहिला आहे. निश्चितच माझ्यासारखी अनेकांची हीच भावना असेल.
कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. या संकट काळात कोणीही, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही केलं पाहिजे. मदतीच्या कामांचा दिखावा केला नाही पाहिजे. अनावश्यक प्रसिध्दी केली नाही पाहिजे, प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आपल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षाच्या बैठकीत रोखठोकपणे सांगणारे सन्माननीय गडकरीसाहेब त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे, दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे.
सन्माननीय गडकरीसाहेब हे स्पष्टवक्ते आहेत. विकासाची दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीला कृतीची जोड देणारे नेते आहेत. त्यामुळेच देशात त्यांच्या रस्ते विकास व महामार्ग खात्याच्या कामांचा आलेख ठळकपणाने दिसतो. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रसिध्दी करण्याची गरज लागत नाही. केंद्रीय मंत्रीमंडळात काम करत असतानाही सन्माननीय गडकरी साहेबांचे महाराष्ट्राच्या विकासकामांवरही बारकाईने लक्ष आहे, हे या निमित्तानं विशेषत्वाने नमुद करावे लागेल. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी दिल्लीतील त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक विषयाला ते नेहमीच सकारात्मकतेने, संवेदनशीलपणे प्रतिसाद देतात.
महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ असलेला हा संवेदनशील नेता दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांची नेहमीच मदत होते, हे नम्रपणे नमुद करावे लागेल. त्यांच्या या सहकार्याच्या, संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक राज्यात ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या वागण्या, बोलण्यात विदर्भाच्या मातीचा रांगडा बाज जरी असला तरी ते संवेदशील, मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळेच केवळ विदर्भातच नाही तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही ऐकारलेपणा, अहंकार, आत्मप्रौढी दिसत नाही, हेच त्यांचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल.
नवतंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे सन्माननीय गडकरीसाहेब आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर दिल्लीत महाराष्ट्राच्या किर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्याच्या प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून देशाची सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.