सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय आहे, अजित पवारांचं फडणवीसांना चॅलेंज
X
आता तुम्ही म्हणाल ऐकावं ते नवलंच, ज्या अजित दादांनी फडणवीसांसोबत पहाटे शपथ घेतली, तेच अजित पवार जेव्हा फडणवीसांना चॅलेंज देतात…. सध्या राज्यात कोरोनाने रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशात पंढरपूर येथे पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून समाधान अवताडे यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोनही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा', असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका,'असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
फडणवीसांच्या या टिकेला आज अजित पवार यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिले. 'राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही' असं म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ते पंढरपूर मधील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा प्रचार जोरात सुरु असताना राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात कोरोनाचे ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. या दुसऱ्या लाटेत आज रोजी राज्यात एकूण ६,१२,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.