BMC Election: राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का? अजित पवार म्हणतात...
X
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही निवडणूक एकत्र लढणार का? कॉंग्रेस ने एकला चलोचा नारा दिला असला तरी राष्ट्रवादीने अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
"राष्ट्रवादीत सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतील. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होऊन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे. आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण होऊ नये. यासाठी प्रयत्न असेल'' असं म्हणत अजित पवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका मांडली.
नामांतरावर काय म्हणाले... प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले... कोणी काय मागणी करावी हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. अशा काळात एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होतो. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे.
त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टीकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही शरद पवारांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आली. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू... असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.