दरोडे टाकून लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड ; 27 लाख 92 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
X
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर, नेवासा, शिर्डी, शेवगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी शेतातील वस्तीवर दरोडे टाकून मारहाण करत लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपुर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. या टोळीकडून तब्बल 27 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे 23 सप्टेंबर रोजी विराज खंडागळे यांच्या घरावर रात्री दरोडेखोरांनी हल्ला करत लूटमार केली होती. त्यामध्ये जवळपास 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आणि श्रीरामपूर पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार नेवासा तालुक्यातील सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराने हे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी छापा टाकत 6 जणांच्या टोळीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता इतर गुन्हे देखील उघड करण्यास पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींवर याआधी तब्बल 44 गुन्हे दाखल असून आता 12 गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे, यांच्याकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.