शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट
राणा दांपत्याच्या अटकेनंतर त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली आहे.
X
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन केंद्रीय गृहसचिवांना देण्यात आले आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या पत्रात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यामध्ये अमरावतीच्या अपक्ष खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा गंभीर असल्याचे म्हटले आहे.
पुढे या पत्रात म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा प्रदान केली आहे. मात्र मुंबई पोलिस त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. याबरोबरच देशातील सर्वोत्कृष्ट पोलिस म्हणून ओळख असलेले मुंबई पोलिस सध्या सरकारचे नोकर असल्यासारखे वागत असल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. तर यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवले आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मुलभुत अधिकारांचे हनन होत आहे. त्याबरोबरच राज्यात अराजकता निर्माण झाली असल्याचे मत फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच किरीट सोमय्या यांच्यावर आतापर्यंत राज्यातील विविध भागात तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. त्यामध्ये वाशिम, पुणे आणि खार पोलिस स्टेशनच्या बाहेर पोलिसांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला असल्याचे यावेळी केंद्रीय गृहसचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी
भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर राज्यात केंद्रीय शिष्टमंडळ पाठवून विरोधी नेत्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची विनंती केली आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडत असल्याने याबद्दल कारवाई करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे.