राहुल गांधी यांच्यानंतर आता कॉग्रेसचं ट्विटर अकाउंट लॉक, मोदी सरकारच्या दबावात कारवाई केल्याचा कॉंग्रेसचा आरोप
X
ट्विटरने मागील आठवड्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं होतं. त्यानंतर गुरुवारी ट्विटरने काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांची अकाऊंट्स लॉक केल्यानंतर आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे. यामुळे ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या दबावाखाली हे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
नियमांचे उल्लंघन करत फोटो पोस्ट केल्यामुळे अकाऊंट लॉक केल्याचे ट्विटरने स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटरच्या म्हणण्यानुसार ही कारवाई गोपनीयता आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाची छायाचित्रे पोस्ट केल्यामुळे ट्विटरने राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांची खाती लॉक केली आहेत. शिवाय काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर खातेही लॉक करण्यात आले आहे.
"कंपनीचे नियम प्रत्येकाला निष्पक्षपणे लागू केले जातात. आमच्या नियमांचे उल्लंघन करत पोस्ट करणाऱ्या अंदाजे शंभर ट्वीट्सवर आम्ही सक्रिय कारवाई केली आहे. या प्रकारची काही वैयक्तिक माहिती इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त धोका निर्माण करते. व्यक्तींची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्याचे आमचे ध्येय आहे." असे ट्विटरच्या प्रवक्त्याने यावेळी सांगितले.
याशिवाय, "ट्विटर प्रत्येकाला ट्विटर नियमांशी परिचित होण्यासाठी आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही गोष्टीची तक्रार करण्यास प्रोत्साहित करते. ट्विटरच्या मते, जर एखादे ट्विट त्याच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आणि वापरकर्त्याने ते काढले नाही, तर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ते एका नोटिसीच्या मागे लपवते. यासोबतच, जोपर्यंत ते ट्विट काढून काढुन टाकत नाही तोपर्यंच ट्विटर खाते ब्लॉक राहते." असे देखील ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले.
ट्विटरने यावर आणखी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग(NCPCR)ने विशिष्ट बाबींविषयी सतर्क केले आहे. ज्यात कथित लैंगिक अत्याचार पीडितेच्या पालकांची ओळख उघड झाली. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पोस्टचे पुनरावलोकन केले तर त्या पोस्ट ट्विटरचे नियम तसेच भारतीय कायद्याच्या विरोधात होत्या.