पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
X
पिंपरी चिंचवड : आर्यन खान (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) विरोधात पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या किरण गोसावीने 2015 मध्ये परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे या व्यक्तीने भोसरी पोलीस (Bhosari police station) ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. गोसावीने ब्रुनेई इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष पीडित व्यक्तीला देऊन 2 लाख 25 हजार इतकी रक्कम घेतल्याची माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे. ज्या- ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन भोसरीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी केले आहे.
या आधीही गोसावीच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये मलेशियात नोकरी लावण्यचे आमिष दाखवून त्याची तब्बल तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांकडून परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने दीड लाख रुपये घेतले होते. या फसवणूक प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावीने मलेशिया, सिंगापूर यासारख्या ठिकाणी नोकरी देण्याच्या आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे. यासाठी त्याने तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहे.