Max Maharashtra impact : मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्तानंतर जिल्हापरिषदेला जाग
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटूंबातील सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारल्याने कडाक्याच्या थंडीत 40 किलोमीटर प्रवास करत शव पारधी कुटूंबियांनी नेले होते. या दुर्दैवी घटनेवर मॅक्स महाराष्ट्रने प्रकाश टाकत रुग्णवाहिकेचा मुद्दा सर्वांसमोर आणला. त्यानंतर अखेर जिल्हा परिषदेने ग्रामिण रुग्णालयांना शव वाहिन्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
X
पालघर जिल्ह्यातील प्रश्नांवर प्रकाश टाकत मॅक्स महाराष्ट्र त्या प्रश्नांचा पाठपुरावा करत असते. त्याच प्रकारे पालघर जिल्ह्यात झालेल्या आदिवासी बालकाच्या मृत्यूनंतर मॅक्स महाराष्ट्रने पालघर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचा मुद्दा सर्वांसमोर आणला. त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेने ग्रामिण रुग्णालयांना शव वाहिन्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर अजय पारधी नावाच्या सहा वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर त्याचे शव नेण्यासाठी रुग्णालयाने वाहन नाकारले. त्यानंतर अजय पारधी याचे वडील युवराज पारधी यांन कडाक्याच्या थंडीत रात्री दोन वाजता अजयचे शव घरी नेले. त्यावर मॅक्स महाराष्ट्रने प्रकाश टाकला. त्यानंतर रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करण्यात आली होती. तर आमदार सुनिल भुसारा यांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र सहा दिवसानंतरही पालकमंत्र्यांनी या घटनेकडे दर्लक्ष केल्याने मॅक्स महाराष्ट्रने जनतेच्या निदर्शनास आणून दिले होते.
या प्रकरणात जव्हार कुटीर रुग्णालयात पैशाअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने थंडीत कुडकुडत दुचाकीवरून शव न्यावे लागले होते. या प्रकरणात मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून सर्वच ग्रामिण रुग्णालयांना शववाहिनी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वढाण यांच्यासह आरोग्य समिती सभापती शिवा सांबरे, महिला व बालकल्याण सभापती गुलाब राऊत आणि जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम, कुसूम झोले व सभापती आशा झुगरे उपस्थित होत्या.