अशरफ घनी यांनी चार कार भरून पैसे घेऊन देश सोडला
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तब्बल चार कार भरून पैसे घेऊन देश सोडला. देशात युद्धजन्य परिस्थिती असताना एवढी रक्कम घेऊन पळ काढल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत.
X
तालीबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळताच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तब्बल चार कार भरून पैसे घेऊन देश सोडला आहे. घनी यांना हेलिकॉप्टरमधून एवढी मोठी रक्कम घेऊन जाता येत नसल्याने काही रोख रक्कम त्यांना तिथेच सोडावी लागली, अशी माहिती रशियन अधिकृत माध्यमांनी दिली आहे.
15 ऑगस्ट रोजी तालिबान बंडखोरांनी काबूलवर हल्ला केला. यावेळी राष्ट्रपती घनी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी देश सोडला. मात्र देशात युद्धजन्य परिस्थिती असतांना घनी यांनी देश सोडल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत.
घनी यांनी देश सोडला तेंव्हा त्यांच्याकडे पैशांनी खचाखच भरलेल्या चार कार होत्या आणि त्यांनी रोख रकमेची दुसरी बॅग हेलिकॉप्टरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही रक्कम सोडून द्यावी लागली. असं रशियन माध्यमांचे म्हणणे आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देश सोडलेले अध्यक्ष अशरफ घनी अमेरिकेत जाऊ शकतात असं आधी सांगितले जात होते, मात्र घनी यांनी अमेरिकेत न जाता ते ताजिकिस्तानला पोहोचले, पण त्यांचे विमान तेथे देखील उतरू शकले नाही. त्यांच्यासोबत अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब हे आहेत. घनी यांनी देश सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले आणि रक्तपात टाळण्यासाठी देश सोडल्याचे सांगितले आहे.
देश सोडून जाण्याच्या टीकेवर, अशरफ घनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे, "आज मला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. मी तालिबानपुढे उभे राहिले पाहिजे. गेली 20 वर्षे मी येथील लोकांना वाचवण्यासाठी माझे आयुष्य घालवले आहे. जर मी देश सोडला नसता तर त्याचे परिणाम येथील लोकांना भोगावे लागले असते."
तालिबान्यांनी मला देश सोडण्यास भाग पाडले, ते काबूलमधील लोकांवर हल्ला करण्यासाठी आले आहेत.तालिबानने हिंसाचाराने लढाई जिंकली असल्याचेही ते म्हणाले. रक्तपात टाळण्यासाठी मला अफगाणिस्तान सोडणे योग्य वाटले असे घनी यांनी म्हंटले आहे.