Home > News Update > ३ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, गुरूवारी पेण बंदची हाक

३ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, गुरूवारी पेण बंदची हाक

३ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, गुरूवारी पेण बंदची हाक
X

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एका तीन वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व संताप व्यक्त होत आहे. चिमुरडीचा बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ आदिवासी कातकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गुरुवारी पेणसह जिल्ह्यातील आदिवासी संघटना व विविध सामाजिक संघटनांनी पेण बंदचे आवाहन केले आहे.

दरम्यान ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या नराधमाला पेण पोलिसांनी तातडीने कारवाई करून अटक केली आहे. या नराधमाने यापूर्वीही बलात्कार व अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. हा आरोपी सध्या जामिनावर सुटला असताना त्याने मंगळवारी रात्री चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याने पेण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी जोर धरत आहे.

शहरातील पेण प्रायव्हेट हायस्कूल शाळेजवळ असलेल्या मळेघरवाडी या आदिवासी वाडीत पीडित चिमुरडी व तिचे कुटुंबीय राहतात. मंगळवारी रात्री ११:३० च्या दरम्यान आरोपी आदेश मधुकर पाटील याने घरात झोपलेल्या ३ वर्षांच्या मुलीला उचलून नेत बलात्कार केला आणि हत्या केली. सदर आरोपी विरोधात पोलिसांनी अपहरण, बलात्कार, ॲट्रॉसिटी, पोस्कोआदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान शाळा-कॉलेज, सोसायटी, व्यापारी, बंगले, कार्यालये, घर, हॉटेल, बँका, संस्था आदी ठिकाणी नागरिकांनी सीसीटीव्ही लावावे तसेच नगरपरिषदेने गर्दीच्या ठिकाणी व शहरात येण्याच्या मार्गांवर त्याचप्रमाणे उद्याने या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.

Updated : 30 Dec 2020 8:39 PM IST
Next Story
Share it
Top