नांदेडच्या गिर्यारोहकाकडून माऊंट युनाम शिखर सर
नांदेड येथील शिक्षक असलेले गिर्यारोहक ओमेश पांचाळ यांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल भागात असलेले माऊंट युनाम हे ६१११ मीटर उंच शिखर सर केले
X
नांदेड : नांदेड येथील शिक्षक असलेले गिर्यारोहक ओमेश पांचाळ यांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल भागात असलेले माऊंट युनाम हे ६१११ मीटर उंच शिखर सर केले आहे. या मोहिमेत देशातील ८ गिर्यारोहकांपैकी ते एकमेव महाराष्ट्रातील गिर्यारोहक होते. ही कामगिरी करुन ते मालेगाव येथे परतले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे फटाके फोडून स्वागत केले.
दि. २४ जुलै रोजी मनाली येथून निघाल्यानंतर किलाँग जिस्पा, बारालाचा यामार्गे भरतपूर येथून त्यांची चढाई सुरू झाली. सुरूवातीला भरतपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन ५५ इतकाच दाखवत होता. परंतु विविध पद्धतीने वातावरणाशी जुळवून घेत त्यांनी स्वतःची ऑक्सिजन पातळी वाढवून ८० पर्यंत नेली. चढाईसाठी सज्ज झाले. या ठिकाणाहून त्यांच्या चमूमधील एकजण आजारी पडल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
भरतपूर ते कॅम्प १ ही खडी चढाई आहे. ओढे नाले क्रॉस करत सर्वजण १७ हजार फूट उंचावरील कॅम्प १ वर पोहोचले. इथे पोहचल्यानंतर पुन्हा एकदा सर्व गिर्यारोहकांची ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. आवश्यक ती सर्व काळजी घेत ३० जुलै रोजी सकाळी शिखराला गवसणी घालण्याचे ठरले. चढाईला सुरू करण्याअगोदर सर्व सदस्यांना चढाईचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते. भल्या पहाटे अडीचच्या सुमारास चढाईला. सुरूवात झाली. परंतु चमूतील अजून एक सदस्य थकव्यामुळे माघारी परतला.
शेवटच्या कॅम्पवरून म्हणजे १७ हजार फुटांवरून २०,१०० फुटांचे अंतर गाठायचे होते. वाटेत अणकुचीदार दगड व खडकांनी आच्छादलेला रस्ता साधारणपणे सहा तास चालल्यानंतर शेवटच्या टप्प्यात बर्फ लागतो. शिखरमाथ्यावर पोहचल्यानंतर तेथून चंद्रभागा व मुलकिला या रांगेतील पर्वत दिसू लागले. पावसापासून व बर्फ वर्षावापासून बचाव करत सर्वजण सकाळी साडेदहाच्या सुमारास युनाम शिखराच्या माथ्यावर पोहोचले. परत उतरत असताना वातावरण अचानक बदलल्यामुळे सगळीकडे व्हाईटआऊट झाले. परंतु रस्त्याचा अंदाज घेत गाईडच्या मदतीने त्यांनी कॅम्पसाईट गाठली. अशाप्रकारे तब्बल २० हजार १०० फुटांवरील शिखर सर करून ओमेश पांचाळ यांनी नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.