कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष-आमदार चव्हाण
X
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरी समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हा नागरीकांवर मोठा अन्याय आहे. प्रशासनाने अनुपालन अहवालही दिलेला नाही. हा अहवाल येत्या सात दिवसात दिला गेला नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनात कल्याण डोंबिवलीच्या समस्या प्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
महिन्याभरापूर्वी नागरीकांच्या समस्या प्रकरणी भाजप आमदार रवी चव्हाण यांनी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळीही महापालिका हद्दीत किती विकास कामे सुरु आहे. ती कधीपर्यंत पूर्ण केली जातील. किती कामे पूर्ण झाली आहे. याचा एक सविस्तर अनुपालन अहवाल तयार करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र एक महिना उलटूनही आयुक्तांनी अनुपालन अहवाल तयार केलेला नाही.यासाठी आज पुन्हा भाजप आमदार रवी चव्हाण यांनी आयुक्तांची भेट घेतली आजच्या भेटीदरम्यान अनुपालन अहवाल तयार करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, संतप्त झालेल्या आमदारांनी येत्या सात दिवसात अनुपालन अहवाल सादर केला नाही. तर नागरी समस्यांप्रकरणी सरकारला हिवाळी अधिवेशनात धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला आहे.