Home > News Update > भंडारा उधळून आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन

भंडारा उधळून आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन

भंडारा उधळून आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन
X

सोलापूर : धनगर समाजाला साहित्याची मोठी गौरवपूर्ण परंपरा आहे. त्यांच्या इतिहासाच्या खुणा अस्मितादर्श आहेत. वस्तुनिष्ठ नवा इतिहास लिहिण्याची गरज आहे त्यासाठी नवे इतिहासकार निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सत्याची पेरणी संमेलनात होते. सत्याची, समन्वयाची पेरणी आवश्यक आहे. जातिव्यवस्था संपली पाहिजे. केवळ माणूस आणि माणुसकी राहावी. बेरजेचे समाजकारण व्हावे असे सांगतानाच आता सर्वांनीच संविधान संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.

श्री संत सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर विजापूर बायपास हायवे बेलाटी येथे होत आहे. शनिवारी दुपारी भंडारा उधळून आणि दीप प्रज्वलन करून तसेच श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलन उद्घाटन सोहळा पार पडला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार एड. रामहरी रुपनवर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे,

माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, समाजसेविका शोभा पाटील, माजी सभापती विजया पाटील, सांगलीचे नगरसेवक विष्णू माने, हुलजंतीचे आडव्याप्पा पुजारी, माजी स्वागत अध्यक्ष प्राचार्य संजय शिंगाडे, साहित्यिक बापूसाहेब हाटकर, उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, सिद्धारूढ बेडगनूर, अण्णाप्पा सतुबर, बाळासाहेब कर्णवर - पाटील हनुमंत वगारे, प्रा. कुंडलिक आलदर, शेखर बंगाळे, निमिषा वाघमोडे, मनीषा माने, बिसलसिद्ध काळे, गणेश पुजारी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, आम्ही सर्व भारतीय मेंढपाळाचे वारस आहोत. ही परंपरा आज ही जिवंत आहे. धनगर समाजाच्या अस्मितेच्या खुणा, थोरवी, महान माणसे नव्या पिढीला ओळख असणे गरजेचे आहे. धनगरांच्या इतिहासातील खुणा या अस्मिता दर्श आहेत. मल्हारराव होळकर यांची मोठी शौर्यगाथा आहे. पुण्यश्लोक ही पदवी फक्त अहिल्यादेवी होळकर यांनाच मिळाली आहे. सबंध भारतीय जनतेने तो दिलेला आशीर्वाद आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकारण करताना लोक कल्याणकारी व मानवतेच्या कल्याणासाठी महान कार्य केले. दानधर्म केले. मंदिरांचे जीर्णोद्धार केले. होळकर परिवाराचा पराक्रम मोठा आहे. पेशवे आणि यशवंतराव होळकर यांचा संघर्ष झाला. जातीवादी लेखकांनी होळकर यांचा इतिहास मागे ठेवला. यामुळे नवे इतिहासकार निर्माण होण्याची गरज आहे. धनगर साहित्य संमेलनातून आव्हाने स्वीकारून असे इतिहासकार निर्माण होतील, अशी अपेक्षा यावेळी डॉ.सबनीस यांनी व्यक्त केली.

संमेलनातून अनेक इतिहास घडत आहेत. नव्या इतिहासाची पेरणी होत आहे. संमेलनात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जागृती होत आहे. 50 टक्के धनगर समाज हा शेळ्या मेंढ्या पाळणारा आहे. धनगर समाजाची अवस्था अद्यापही चांगली नाही. आदिवासी आणि धनगर हा हे भाऊ भाऊ आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. ही गंभीर बाब आहे. धनगर समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आरक्षणासंदर्भातील ही चूक अनेक वर्षांपासून सुधारली जात नाही. सर्वांनी एकजुटीने यासंदर्भात पाठपुरावा करावा. यासाठी राष्ट्रीय स्तरावर अधिवेशन घेऊन रान उठवण्याची खरी गरज आहे,असे सबनीस म्हणाले.

सत्ताकारण भ्रष्ट कल्पना आहे. आश्वासन पूर्तता केली जात नाही. राजकारणाने आता विश्वास गमावला. कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते लोक कल्याण करणारे हवे. निष्ठा लोप पावत आहेत. श्री संत बाळूमामा हे संत परंपरेतील आहेत पण त्यांच्या बाबतीतील अंधश्रद्धा टाळल्या पाहिजेत.जातीव्यवस्था संपली पाहिजे. जात नष्ट करणे यांचे संस्कार आता रुजवण्याची गरज आहे. फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आपण आहोत. सत्याची बेरीज म्हणजे मानवतावाद. मानवधर्म श्रेष्ठ आहे. बेरजेचे समाजकारण व्हावे. सर्व संत महापुरुष यांच्या विचारांची सांगड घालावी लागेल. महापुरुषांना जात धर्म नसतो. गळ्यात गळा घालून आता सर्वांनी पुढे गेले पाहिजे. संविधान संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन यावेळी जेष्ठ साहित्य साहित्यिक डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी यावेळी केले.





आपल्या जोश पूर्ण भाषणात संमेलनाचे अध्यक्ष माजी आमदार एडवोकेट रामहरी रुपनवर म्हणाले, धनाचे आगर म्हणजे धनगर. त्यावेळी सर्वाधिक श्रीमंत हा धनगर समाज होता. धनगर समाजात अनेक कवी साहित्यिक आहेत. संविधानात धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. आरक्षणाची चांगल्या पद्धतीने मांडणी झाली तर ते मिळू शकते. यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.जो समाज इतिहास वाचत नाही, तो घडवू शकत नाही. तो समाज मागे राहतो. आपले आदर्श आपल्याला माहीत पाहिजेत. साहित्य, पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यातून ऊर्जा मिळते. धनगर समाज राजकीय क्षेत्रात कमी आहे असे सांगतानाच एडवोकेट रुपनवर यांनी इतिहासातील अनेक अभ्यासपूर्ण दाखले दिले.

संस्थापक प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले म्हणाले, विद्यार्थ्यांना युवकांना, साहित्यिकांना, कवींना व्यासपीठ मिळावे यासाठी गेल्या गेल्या पाच वर्षापासून हे संमेलन भरविले जात आहे.विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. हे संमेलन अखंडितपणे वर्षांनुवर्ष होत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक सिद्धारूढ बेडगनूर यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव व्हनमाने यांनी केले तर प्रा. देवेंद्र मदने यांनी आभार मानले.

वाडा - तांड्यावरची शाळा सुरू करण्याची गरज : कुलगुरू

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. आरक्षणाची मागणी करीत असताना समाजाने शिक्षणाचे कास धरली पाहिजे तरच पुढे आरक्षणाचा फायदा करून घेऊ शकणार आहोत. त्यासाठी वाडा तांड्यावरची शाळा सुरू करण्याची गरज आहे. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणात समाजाचा टक्का वाढविण्याची आवश्यकता आहे. धनगर समाजाचे खूप साहित्य उपलब्ध आहे. या संमेलनाच्या माध्यमातून ते पुढे आणले जात आहे, हे निश्चित कौतुकाची बाब आहे. या संमेलनाचा डंका देशभर व्हावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी यावेळी केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान

यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रा. शिवाजीराव बंडगर , पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर - पाटील रामचंद्र खांडेकर , डॉक्टर संदीप हजारे, पत्रकार सलीम पटेल आदींचा यावेळी पुरस्काराने गौरव करण्यात आला. मानाची घोंगडी, पिवळे उपरणे, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.





Updated : 25 Feb 2024 8:16 AM IST
Next Story
Share it
Top