कैद्यांसाठी भजन स्पर्धा, देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात
X
कल्याण : आयुष्यात केलेला एखादा गुन्हा किंवा एखाद्या चुकीमुळे तुरुंगात जावे लागलेल्या लोकांकडे समाज कायम गुन्हेगार या नजरेतून पाहत असतो. या गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यासाठी तुरुंग प्रशासन देखील या कैद्यांसाठी काही उपक्रम आयोजित करत असते. असाच एक वेगळा आणि देशातील पहिला प्रयोग कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात करण्यात आला. संत तुकाराम महाराज यांच्या नावाने कैद्यांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन आधारवाडी कारागृहात करण्यात आले होते. यामध्ये कैद्यांना संत तुकारामांच्या अभंग रचनांपैकी तीन रचना किंवा सामाजिक विषयावर रचना सादर करण्यास सांगण्यात आल्या होत्या.
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्यावतीने देशात पहिल्यांदाच संत तुकाराम महाराज यांच्या नावाने कैद्यांसाठी राज्यस्तरीय भजन,आणि अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात जवळपास ६० ते ६५ कारागृह आहेत. यामधील २८ कारागृहांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या स्पर्धेत कैद्यांनीच भजनं गायली आणि त्यांना सांगितीक साथही कैद्यांनीच दिली आहे. तसेच अध्यात्माच्या माध्यमातून संतांनी जे शिकवले आहे, त्यामुळे कारागृहतील कैद्यांना भविष्यातील आयुष्य जगण्यासाठी ते उपयुक्त ठरतील असा या स्पर्धेचा हेतू असल्याचे स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.