नांदेड कोरोना लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट सक्रिय
X
नांदेड : नांदेड जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोवीडची लस न घेता दुसऱ्या लसीचे प्रमाणपत्राचे वाटप करण्याचा प्रकार नांदेड शहरात सुरू असल्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख यांनी म्हटले आहे. मी स्वतः दुसरी लस घेतलीच नाही तरी मला दुसऱ्या लसीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामध्ये शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासनाला आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे असे दाखवायचे आहे असे देखील असू शकते किंवा लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट सक्रिय झाल्याचे नाकारता येणार नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
देशमुख यांनी पहिला डोस घेतला आहे, पण त्यांना दुसरा डोस घेण्याआधीच दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने आता दुसरा डोस घ्यायचा तरी कसा? असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण होत आहे की नाही हे पाहावं असं त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना शासन प्रशासन लसीकरणावर भर देत आहेत, तर दुसरीकडे अशा पद्धतीने बोगस प्रमाणपत्र दिले जात असेल तर, खऱ्या अर्थाने लसीकरण झाले की नाही याबाबत योग्य आकडेवारी उपलब्ध होणार नाही. आणि कोरोना विरोधातील ही लढाई कशी जिंकता येईल असं देशमुख म्हणाले. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेत चौकशी करून असे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.