गौरी लंकेश ह&त्या प्रकरणातील आरोपीचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश; प्रमुख पदावर नियुक्ती
X
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. जालन्यात आयोजित एका कार्यक्रमात शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश झाला, आणि त्यानंतर त्याला जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले. या घटनामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
गौरी लंकेश यांची हत्या २०१७ मध्ये त्यांच्या बंगळुरूतील राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून करण्यात आली होती. या प्रकरणात एसआयटीने अमोल काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौकशीत अमोल काळेने सांगितले होते की, महाराष्ट्रातील एका व्यक्तीने लंकेश यांच्या हत्येची सुपारी दिली होती. श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये पांगारकरला अटक करण्यात आली होती, पण कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला जामीन मंजूर केला.
शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले, “श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत आणि त्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.” पांगारकर जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचेही खोतकर यांनी नमूद केले. तथापि, महायुतीच्या जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने याबाबत काहीही स्पष्टता नाही.
श्रीकांत पांगारकर हे जालन्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत, तर त्यांचे वडील जगन्नाथ पांगारकर भाजपाचे माजी नगरसेवक होते. श्रीकांतने २००१ ते २०१० पर्यंत शिवसेनेत नगरसेवक म्हणून काम केले. २०११ मध्ये शिवसेनेला सोडून दिल्यानंतर, तो हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करू लागला. त्याने केदारनाथमधील जलप्रलयानंतर मदतकार्यासाठी तिथेही योगदान दिले.
श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेत आता ताज्या चर्चांना उधाण आले असून, राजकारणात त्याची भूमिका आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याची सहभागिता वादग्रस्त ठरू शकते.