पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या, अन्यथा सरकारी वार्तांकनावर बहिष्कार टाकू, पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
X
महाराष्ट्रात कोरोनामुळं बळी गेलेल्या पत्रकारांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. अशा परिस्थिती पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. या संदर्भात राज्यातील अनेक पत्रकार संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहेत. मात्र, सरकार याबाबत गांभीर्याने पाहत नसल्याचं आत्तापर्यंत समोर आलं आहे.
पत्रकारांना कोरोना काळात लोकांच्या समस्या मांडण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. अशा परिस्थितीत पत्रकारांना कोरोनाची भीती मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच देशात कोरोनामुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पत्रकारांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यानं पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा म्हणून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी ऑनलाईन आंदोलन केलं आहे.
या आंदोलनात मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्यासह, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, माजी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास आठवले, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंह यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तसेच देशातील इतर संघटनांचे पत्रकार सहभागी झाले होते.
यावेळी सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, अशी मागणी या आंदोलनात सहभागी झालेल्या पत्रकारांनी केली आहे. सध्याच्या काळात तरुण पत्रकारांचा जीव धोक्यात जात असताना सरकारने जर पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिला नाही तर सरकारच्या कामकाजाचं वार्तांकन न करण्याचा इशारा या ऑनलाईन आंदोलनात दिला आहे.
विशेष बाब म्हणजे सरकारमधील मंत्री देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देत असून त्याकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करताना दिसत आहेत. देशातील अनेक राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा दिला आहे. असं असताना महाराष्ट्र पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्करचा दर्जा का देत नाही. असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.