लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करत जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवा- जिल्हाधिकारी राठोड
X
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे यासोबतच लसीकरणही तेवढेच महत्वाचे असुन जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी प्रत्येक तालुक्यात लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करुन लसीकरणाचा वेग अधिक प्रमाणात वाढलाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देत लसीकरणाच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी स्पष्ट केले.
कोव्हीड19 लसीकरणाबाबत जिल्हा कृती दलाच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला दर दिवशी लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे लसीकरण व्हावे यादृष्टीने गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात येऊन तालुक्यातील लसीकरण वेगाने पुर्ण करावे.
या मोहिमेमध्ये केवळ आरोग्य विभागच नव्हे तर इतर विभागांच्या प्रमुखांनीही सहभाग घेत एकमेकांमध्ये समन्वय राखुन लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दरम्यान संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राठोड यांनी दिल्या.