लाचखोर मित्राला भेटून आले आणि ACBच्या जाळ्यात स्वत:ही अडकले
X
बीड: लाच घेताना शासकीय नोकरदारांमध्ये भीतीच राहिली नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आता त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा बीडमध्ये पाहायला मिळाला. लाच प्रकरणात अडकलेले पाटोदा पंचायत समिती गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना गुरुवारी दुपारी माजलगावचे त्यांचे मित्र उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड एसीबीच्या कार्यालयात भेटले अन् संध्याकाळी स्वत: ६५ हजारांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे.
पाटोदा तालुक्यातील सार्वजनिक विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर देयक मंजूर करण्यासाठी ३७ हजार रुपयांची लाच घेताना गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली होती.
त्यामुळे गुरुवारी मिसाळ यांची उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी एसीबीच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. गायकवाड व मिसाळ हे वर्गमित्र असल्याने गायकवाड हे बुधवारी दुपारी मिसाळ यांना भेटण्यासाठी बीड एसीबीच्या कार्यालयात आले होते. मात्र मित्राचे सांत्वन करून माजलगावात गेल्यावर ६५ हजारांची लाच घेताना तेही एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ पकडले गेले.
वाळूची गाडी सुरू करायची असेल, तर अगोदर हप्ता द्या. दुसऱ्याकडून १ लाख १० हजार घेतो; पण तुम्ही खूप जवळचे आहात, त्यामुळे ६५ हजार रुपयेच द्या, असा संवाद माजलगावच्या उपजिल्हाधिकाऱ्याने तक्रारदाराशी केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ही कारवाई झाली.
लाचेची मागणी करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपला मित्र एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे माहीत असतानाही गायकवाड यांची लाच मागण्याची हिंमत झाली कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र तोंडाला 'लाचे'च रक्त लागल्याने आशा अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही हेही तेवढंच सत्य आहे.