Home > News Update > पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आरोपीला भाजपकडून पदाची खैरात

पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आरोपीला भाजपकडून पदाची खैरात

पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला आरोप भाजपला सापडला असून त्याला पक्षाचे पद बक्षीसी म्हणून देण्याचा प्रकार मराठवाड्यात घडला आहे.

पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आरोपीला भाजपकडून पदाची खैरात
X

औरंगाबाद: चार वर्षांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेला आणि पोलीस रेकॉर्डवर फरार असलेल्या आरोपीला भाजपकडून महत्वाच्या पदाची खैरात देण्यात आली असल्याचा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात समोर आला आहे.

भाजपच्या पैठण युवा मोर्च्याच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या दीपक फांदाडे यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका खासगी कंपनीत जाऊन आंदोलनाच्या नावाने तोडफोड करणे, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी 2018 मध्ये बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. मात्र राजकीय दबावामुळे त्यंना अटक होत नसल्याची चर्चा होती. त्यामुळे सदर आरोपी सापडत नसून, फरार असल्याचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता. मात्र पोलिसांना न सापडणारा हा आरोपी भाजपला सापडला असून, त्याला महत्वाचं पदसुद्धा देण्यात आलं असल्याने आता चर्चेचा विषय बनला आहे.


नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीच्या इतर दोन ज्येष्ठ मंत्र्यांचा गंभीर गुन्ह्यातील आरोपींसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. यावरून भाजपकडून जोरदार टीकासुद्धा करण्यात आली होती. मात्र आता खुद्द भाजपाकडूनच गुन्हेगाराला पदे दिले गेले आहे.

आरोपीचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध आहे का?

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 9 ऑगस्ट 2018 रोजी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी काही लोकांनी वाळूज एमआयडीसी आणि चित्तेगाव एमआयडीसीमध्ये जाऊन कंपन्यांमध्ये तोडफोड करत गोंधळ घातला होता. तर या तोडफोड करणाऱ्या लोकांचा मराठा क्रांती मोर्चाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याच तोडफोड प्रकरणी दीपक फांदाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजपचे म्हणणे काय?

"याबाबत मला माहिती नाही, पण काय प्रकरण आहे याची माहिती घेऊन कळवतो," अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष सुरुज लोळगे यांनी दिली.

Updated : 10 Feb 2021 1:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top