रोहीत सरदानाचा मृत्यू, आज तक सरकारला जाब विचारणार का?
X
आज तक चे स्टार ॲंकर रोहीत सरदाना यांच्या निधनाची बातमी आली आणि माध्यमक्षेत्रात कधीही भरुन निघणार नाही. अशी पोकळी निर्माण झाली. रोहीत सरदाना आज तक चे ॲंकर असले तरीही त्यांच्या निधनाच्या बातमीची दखल देशातील प्रत्येक नॅशनल आणि रिजनल चॅनल्सना घ्यावी लागली. इतकी त्यांची प्रसिद्धी होती. रोहीत यांच्या निधनाची बातमी कळताच कला, क्रीडा, राजकीय अशा जवळपास सर्वच क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
रोहीत सरदाना गेल्याची बातमी सर्वात अगोदर आज तक नेच प्रसारीत केली. आणि ज्यावेळी ही बातमी प्रसारीत केली. त्यावेळी अगदी सर्वसामान्य बातम्यांप्रमाणेच त्यांच्या निधनाची बातमी प्रसारीत झाली. आणि आपली जबाबदारी पार पाडत चॅनलने त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. इथंवर सर्व काही ठीक होतं. पण त्यानंतर आज तक ने त्यांच्या मृत्यूनंतर जे केलं ते पत्रकार म्हणून धक्कादायक वाटलं.
मागच्या वर्षी २ सप्टेंबर २०२० रोजी TV9 चे पुणे प्रतिनीधी पांडुरंग रायकर यांच निधन झालं आणि TV9 ने त्यांच्या निधनाची बातमी प्रसारीत केली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निधनाबद्दल ठाकरे सरकार आणि प्रशासनाला महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी आणि चॅनलनी जाब विचारत धारेवर धरलं व तसेच चॅनलने त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला. हे आपण सर्वच जाणतो. इतरवेळी छोट्याश्या गोष्टीचाही बाऊ करुन प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या चॅनलने मात्र, त्यावेळी संवेदनशीलता दाखवत पांडुरंग यांच्या निधनाचा बाऊ करुन टी.आर.पी. मिळवण्यापेक्षा वास्तवीकता डोळ्यासमोर ठेवून संवेदनशीलता राखली.
परंतू आज तकने मात्र, पत्रकारीतेची मूल्य बाजूला ठेवून आपल्याच सहकाऱ्याच्या मृत्युचा बाजार करत ड्रामा करण्यास सुरवात केली. रोहीत यांच्या निधनानंतर ठीक १२ वाजता आज तक ने 'किसका होगा राजतीलक' हा प्रोग्राम केला. ज्यात श्वेता सिंगने अगदी हसत-हसत वृत्तांकन केल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी चॅनलला रोहीत यांच्या निधनाचं दु:ख नव्हतं का?
बिहारचे भाजप आय.टी. सेल मेंबर मनिष पांडे यांनी ट्विटरवर याबद्दल अंजना कश्यप यांना विचारना केली असता 'रोहीतच्या आई वडिलांना त्यांच्या निधनाबद्दलची पूर्ण माहिती मिळेपर्यंत आम्ही संयम ठेवला. ज्याला तुम्ही उशीर करणं म्हणता त्याला आम्ही संवेदनशीलता म्हणतो. रोहीतचं निधन ही तुमच्यासाठी बातमी असेल, आई वडिलांना त्यांच्या जाण्याची बातमी ही चॅनलवरुन कळायला नको' अशी सारवा-सारव अंजना यांनी केली.
मात्र, रोहितच्या वडिलांना ही बातमी कळू नये. म्हणून आम्ही बातमी केली नाही. असं म्हणणाऱ्या आज तकने एक टीकर दिले होते. मात्र, ज्यावेळी इतर चॅनल्स संपुर्ण शोद्वारे रोहीतच्या बातमीवरती उतरले, आणि आपल्या चॅनलच्या बातमीतून इतर चॅनल्स टी.आर.पी. मिळवतायेत हे आज तक च्या लक्षात आले. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य पाहता आज तक आपल्या ॲंकर्सना रडारड करायला लावत संपुर्ण ताकतीने रोहीतच्या बातमीवरती उतरलं. आज तक ने स्वत:च्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा खेळ करुन 'मेल्याच्या टाळुवरच लोणी खाण्याचा' केलेला हा प्रकार म्हणजे पत्रकारीतेतील निच वृत्तीच म्हणावं लागेल.
शुभम शिंदे, पत्रकार