कोरोनामधून बरे झालेल्या महिलेला गंभीर त्रास, भारतातील पहिली घटना
कोरोनाचे रुग्ण सध्या कमी झाले असले तरी काही जणांना कोरोना होऊन गेला तरी कळत नसल्याचे प्रकारही आढळले आहेत. औरंगाबादमध्ये एका महिलेला झालेल्या त्रासातून कोरोनाचे दुष्परिणाम काय असू शकतात याचे भारतातील पहिले उदाहरण समोर आले आहे.
X
औरंगाबाद: कोरोनाग्रस्त रुग्ण बरा झाल्यावर सुद्धा त्याच्या शरीरातील अवयवांवर विपरित परिणाम होत असल्याचं विविध अभ्यासातून आढळून आलं आहे. पण कोरोना झाल्यानंतर शरीरात पू निर्माण झाल्याची धक्कादायक घटना जर्मनीनंतर पहिल्यांदाच भारतात समोर आली आहे. औरंगाबाद येथील एका महिलेच्या शरीरात कोरोना झाल्यानंतर पू निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे वैद्यकीय यंत्रणाही चक्रावली आहे. तर सदर महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले आहे. या महिलेच्या मणका आणि शरीरातील अन्य अवयवातून तब्बल 500 मि.ली पू काढण्यात आला आहे. तर या महिलेच्या मणक्याची शस्त्रक्रिया तीन तास चालली. तसेच दुसरी आणि तिसरी शस्त्रक्रिया अनुक्रमे दीड आणि एक तास चालली. विशेष म्हणजे सदर महिलेला कोरोनाचे निदान झाले नव्हते. तसेच कुटुंबातील कुणालाही कोरोनाची लागण झालेली नव्हती. मात्र त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी मणकाविकारतज्ञांकडे उपचर सुरू केले. पुढे डॉक्टरांनी आजाराचे कारण शोधण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान या महिलेची ऑंन्टी बॉडी टेस्ट करण्यात आली आणि त्यातूनच त्यांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले.
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या शरीरात पू होण्याच्या घटना यापूर्वी जर्मनीत आढळून आल्या होत्या. आतापर्यंत जर्मनीत आशा 6 घटना घडल्या आहेत. मात्र भारतात ही पहिलीच घटना असून, जगातील 7 वी घटना असल्याची माहिती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर श्रीकांत दहिभाते यांनी माध्यमांना दिला.