न्याय मिळवण्यासाठी महिला पोलीस पाटलावर 'आत्महत्येची' वेळ
X
औरंगाबाद जिल्ल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव या गावात पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर तिने विष घेतले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि गावात संतापाची लाट पसरली. यानंतर संतप्त जमावाने शुक्रवारी (11 डिसेंबर) रोजी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक केली.
संबंधित पोलीस पाटील महिलेने काही लोकांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन दिवसांनी संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांनाच टार्गेट केले. पोलिसांनी योग्य पाऊल उचलले नसल्याने महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा आरोप तिचे कुटुंब आणि गावकऱ्यांनी केला आहे.
केळगाव येथील महिला पोलीस पाटील यांनी विष प्राशन करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात या महिलेने अनेक गंभीर आरोप केले होते. आपल्या गावातील ग्रामपंचायतीचा शिपाई हा वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता. आपल्याला लाज वाटेल अशी भाषा करत होता. त्यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी याकडे काणाडोळा केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप सदर महिलेने केला होता.
विष घेण्याआधी त्या महिलेने केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की, "ग्रामपंचायत शिपाई रामदास विठ्ठल वाघ, त्याची आई मीरा वाघ, बहीण सुनीता वाघ हे वारंवार आर्थिक व मानसिक त्रास देऊन अश्लील भाषेत घरासमोर येऊन शिवीगाळ करतात. पोलिस प्रशासन व गावदेखील काहीच करीत नसून, मी वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. सदर व्यक्ती पोलिसांना वारंवार त्यास मारहाण झाल्याच्या खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देतो. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा त्रास सहन करीत आहे. घरी पती व कोणी नसताना वाघ हा वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. माझ्या आत्महत्येस पोलिस प्रशासन व गाव जबाबदार राहील."
आरोपीने त्रास देण्याचे कारण काय?
ज्या ग्रामपंचायत शिपायाच्या त्रासाला कंटाळून पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचे वडील विठ्ठल वाघ हे सुद्धा ग्रामपंचायत शिपाई म्हणून कामाला होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांना गावचे सरपंच व उपसरपंच यांनी मारहाण करून खून केला, असा आरोप त्यांचा मुलगा रामदास विठ्ठल वाघ, पत्नी मीराबाई विठ्ठल वाघ आणि मुलगी सुनिता विठ्ठल वाघ यांनी केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तेव्हापासून सदर कुटुंब महिला पोलीस पाटील यांना जबाबदार समजून त्रास देत होते, अशी माहिती मिळते आहे.
दरम्यान पोलिसांनी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. पण तिने विष घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी रामदास वाघ याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. मात्र दुसऱ्याच दिवशी आरोपींना जामीन मिळाला. त्यामुळे पोलिसांनी योग्य आणि गंभीर गुन्हे दाखल केले नसल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवला. यावेळी पोलिसांनी रोखण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्यावर सुद्धा ग्रामस्थांनी दगडफेक केली.
ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या दोन गाड्या फोडण्यात आल्या आहे. तसेच यावेळी ग्रामस्थांनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या दंगा काबू पथकाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला. मात्र तरीही गावकरी मागे हटण्यास तयार नव्हते. घटनेची गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यात 4 राउंड हवेत फायर करण्यात आले. यावेळी एक अधिकारी तसेचं 3 कर्मचारी जखमी झाले होते.
60 जणांवर गुन्हे दाखल
ग्रामस्थांनी केलेल्या हल्यानंतर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून,अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात 10 लोकांवर ॲट्रॉसिटी तर इतर 50 जणांवर सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर गावातील अनेक जण भूमिगत झाले असून, काहींनी घराला कुलूप लावून इतर ठिकाणी निघून गेल्याचे पाहायला मिळत आहे.
न्याय मिळवण्यासाठी पोलीस पाटलावर 'आत्महत्येची' वेळ
पीडित महिला निर्मला ईवरे यांनी ग्रामपंचायत शिपाई रामदास वाघ आणि त्याची आई मीरा वाघ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप व्हिडीओमधून केला आहे.स्था निक पोलिसांनी तक्रार देऊन ही वेळीच दखल न घेतल्याने आपल्यावर ही वेळ आली असल्याचा आरोप सुद्धा या महिला पोलीस पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिलेने विष पिल्याननंतर सुद्धा काहीच हालचाली झाल्या नाही.त्यामुळे महिलेच्या पतीसह केळगाव येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यलाय गाठले.तसेच जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यालयातून न हळण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी गावातील पोलीस पाटलावर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य व्यक्तींच काय होत असेल.
पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातल्याने प्रकार घडला- महिलेच्या पतीचा आरोप
सदर वाघ कुटुंब दोन-तीन वर्षापासून आम्हाला खूप त्रास देत आहे. हा त्रास सहन होत नसल्यामुळेच माझ्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातले म्हणून हा प्रकार घडला. तर आता गावातील लोकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी असल्याचं पीडित महिलेच्या पतीने माध्यमांशी बोलताना सांगितले.
या प्रकरणाची चौकशी होईल: पालकमंत्री
या प्रकरणाची सगळ्याच बाजूने चौकशी होईल, कोणालाही सोडले जाणार नाही. तसेच यात पोलिस दोषी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
महिलांचे सक्षमीकऱण आणि सुरक्षितेतसाठी आता सरकारने शक्ती कायद्याची तयारी केली आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे ध्येय असताना इथे काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण देण्याची गरज आहे. त्यासाठी असा त्रास होत असेल तर पोलिसांनी महिलांच्या तक्रारींची दखल घेतली पाहिजे यासाठी धोरण आखण्याची गरज आहे.
या प्रकरणाची चौकशी होईल: पालकमंत्री
या प्रकरणाची सगळ्याच बाजूने चौकशी होईल, कोणालाही सोडले जाणार नाही. तसेच यात पोलिस दोषी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
ग्रामपंचायतीचा शिपाई हा पोलिस पाटील महिलेला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचा तिचा आरोप आरोप होता. याचा त्रास सहन न झाल्याने सदर महिला पोलिस पाटलाने 10 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ सुद्धा बनवला होता. यात त्यांनी होत असलेल्या त्रासाबद्दल सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी याकडे काणाडोळा केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला होता.