गावकऱ्यांवर नदी पात्रात राष्ट्रगीत म्हणण्याची वेळ का आली?
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा होताना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धानोरा गावातील नागरिकांनी नदी पात्रात राष्ट्रगीत म्हटले. पण ही वेळ त्यांच्यावर का आली? जाणून घेण्यासाठी वाचा...
X
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला आणि यंदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृतमहोत्सव देखील साजरा झाला. पण गेल्या ७५ वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता या गावानजीक असलेल्या नदीवर साधा पूल देखील बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढत आपले घर गाठावे लागत आहे. शाससाने लक्ष आपल्या समस्येकडे वेधण्यासाठी धानोरातील गावकऱ्यांनी चक्क पाण्यात उभं राहून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला राष्ट्रगीत गायले आहे.
निधी नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचे काम रखडले आहे. वारंवार पत्र पाठवूनही १० वर्षांपासून धानोरा गावाच्या पुलाकडे पाहायला शासन आणि प्रशासनाकडे वेळ नाही अशी स्थिती आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धानोरा आणि जवळच असलेल्या गांधीनगर येथील शाळकरी मुलांना या पाण्यातून मार्ग काढत शाळा गाठावी लागते तर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी या पाण्यातून मार्ग काढत गेली अनेक वर्षे गावकरी ये-जा करीत असतात. पुढच्या काळात या पुलासाठी निधी मंजूर नाही झाल्यास येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी पाण्यात बसून उपोषण करणार असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.