परमबीर सिंग यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल होणार
राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. कारण सिंग यांच्यासोबत काम केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने आता सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
X
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या परमबीर सिंग यांच्या अडचणी आता वाढणार आहेत. सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परमबीर सिंग हे १७ मार्च, २०१५ ते दि. ३१ जुलै २०१८ पर्यंत हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. याच काळात त्यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करून स्वतःचे आर्थिक फायदयासाठी मनमानी कारभार करून भष्टांचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक बी.आर.घाडगे यांनी यासंर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.
परमबीर सिंगांवर आरोप
कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास फक्त एकच शासकीय निवासस्थान बाळगण्याची परवानगी असते. पण परमबीर सिंग हे ठाणे शहराचे पोलीस आयुक्त असतांना दोन शासकीय निवासस्थानांचा वापर करत होते, हा गुन्हा असल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच आपण तक्रार केल्यानंतर त्यांनी एकुण २९ लाख ४३ हजार ८२५ एवढी रक्कम भरणा केली आहे, त्यामुळे परमबीर सिंग यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग केला असल्याचे सिध्द झालेले आहे, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असतांना त्यांना फक्त दोन कुक व एक टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची परवानगी होती. पण त्यांनी आपल्या निवासस्थानी एस.आर.पी.एफ.चे ६ पोलीस कर्मचारी आणि ठाणे येथील नेमणुकीतील १४ पोलीस कर्मचारी असा वापर केला. तसेच मुंबई येथील निवासस्थानी त्यांच्या कुटूबाकरिता एस.आर.पी.एफ.चे १० पोलीस कर्मचारी आणि ३ वाहन चालक बेकायदेशीरपणे वापरून त्यांनी पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग करून भष्टाचार केलेला आहे.
परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना ठाणे शहर व इतर कोणत्याही ठिकाणी नेमणुकीला असतांना त्यांच्यासोबत पोलीस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा आणि पो.ना. प्रशांत पाटील असे दोघजण हे गेले २० वर्षापासून होते. ते दिवस रात्र खाजगी व्यवहारासाठी व बदल्यांमधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा करत होते. त्या दोघांनाही मा. परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीर सिंग यांनी सिधुदूर्ग जिल्हयात दुसऱ्याच्या नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.
परमबीर सिंग यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नेमणुक होण्यापूर्वी ते कल्याण येथे पोलीस उप आयुक्त, होते. तिथे प्रकाश मुथा हे त्यांचे मित्र होते. त्याच्यामार्फत सिंग यांनी रिव्हॉल्व्हर लायसन्सच्या कामासाठी १० ते १५ लाख रूपये घेवुन लायसन्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बिल्डर्सची काम करुन देण्यासाठी करोडो रूपयाची देवाण घेवाण करुन सेंटलमेंट करून केली जात होती, असाही आरोप करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्ष म्हणुन नेमणुक करतांना सुमारे १ करोड ५० लाख रूपये घेतल्याशिवाय बदल्या केल्या जात नव्हत्या. परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनच्या डिसीपी कडून प्रत्येकी ४० ताळे सोन्याचे बिस्कीट, सहा पोलीस आयुक्तांकडून प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट व वरीष्ठ पोलीस निरीक्षकाकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याचे बिस्कीटे घेत होते असा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका श्रीमंत माणासाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी सिंग यांनी आपल्यावर खोटे आरोप करुन निलंबित केले होते, असा आरोपही बी.आर.घाडगे यांनी केला आहे.