सामाजिक सलोख्याचा अनोखा संदेश, मराठा कुटुंबाने केली बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
X
कातळाने बनलेल्या त्याच्या छाताडातुन प्रेमाचा झराच वाहतो. वाटतं हे प्रेम कुण्या एका वस्तीसाठी
कुण्या एका धर्मासाठी मुळीच नाही...
हे प्रेम सम्यकासाठी तहाणलेल्या
प्रत्येक ओंजळीसाठी....
वरील कवितेच्या ओळींमध्ये तथागत गौतम बुद्ध यांचे अतिशय समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. जगात दुःख आहे आणि या दुःखाला कारण आहे हे जगातील सत्य.... दुःख निवारणाचा मार्गही त्यांनी सांगितला. पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता सांगितल्या. त्यांनी सांगितलेल्या या मार्गाचे आचरण केल्यास मनुष्याच्या आयुष्यातील दुःख नष्ट होते. त्यांनी दिलेला हा मार्ग कोणत्या एका जातीसाठी अथवा धर्मासाठी नव्हता. प्रज्ञा, शील, करुणा या त्रिसुत्रीवर त्यांचे तत्त्वज्ञान आधारित होते. भगवान बुध्दांनी जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला. परंतु कालांतराने याच महापुरुषाला जातीच्या आणि धर्माच्या बंधनात अडकवले गेले.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात येणाऱ्या भेंडवडे या गावात मात्र एक अनोखी सामाजिक अभिसरणाची घटना घडलेली आहे. एका जातीत एका धर्मात सीमित ठेवल्या गेलेल्या बुद्धाला तेथून सामूहिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गावातील नूतन बौद्ध विहारात मराठा कुटुंबाने बुद्ध मूर्तीदान केली आहे. विकास इंगळे यांनी त्यांचे वडिल विठ्ठल इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुद्धगया येथून सदर बुद्ध मूर्ती आणली आहे. या बुध्दमूर्तीची प्रतिष्ठापना नूतन विहारात करण्यात आली. यावेळी विकास इंगळे यांच्या घरातून ही मूर्ती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत विहारापर्यंत मिरवणूक काढून आणण्यात आली. याबाबत विजय कांबळे सांगतात " अनेक वर्षापासून विठ्ठल आप्पा इंगळे यांचा सोने चांदीचा व्यवसाय बुद्धगया येथे नावारुपास आलेला आहे. त्यांची इच्छा होती की बुद्धगया आंतरराष्ट्रीय स्थळ आहे. येथून बुद्धाचा वारसा माझ्या गावापर्यंत जावा अशी त्यांची ईच्छा होती. पण जिवंतपणी ती पूर्ण झाली नाही. त्यांची पत्नी सुमन इंगळे, मुलगा विकास इंगळे यांनी त्यांची इच्छा पूर्ण करत ही मूर्ती आणली. त्याची प्रतिष्ठापना येथे करण्यात आली आहे.
सुमन इंगळे सांगतात "आमची एक इच्छा होती, सत्तर वर्षे बुध्दाच्या भूमीत आमचा व्यवसाय नावारुपास आला. आम्हाला बुद्धाचा आशीर्वाद मिळाला. त्याचे काहीतरी स्थान माझ्या गावात व्हावे. या इच्छेतून आम्ही सन्मानाने आणि अभिमानाने ही मूर्ती आणली आहे.
विकास इंगळे सांगतात प्रत्येक रविवारी आम्ही बुद्धगया येथे जातो. तिथे प्रसन्नता वाटते. तेथील निर्मळ वातावरण हा ज्ञानाचा वारसा आहे. ती प्रसन्नता तो ज्ञानाचा वारसा गावात यावा या उद्देशाने मी यासाठी पुढाकार घेतला आहे. भेंडवडे येथील या प्रसंगाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत दीपक सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रिक परीक्षा झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी भेट दिलेल्या बुद्ध चरित्राच्या घटनेची आठवण सांगितली. मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना ते म्हणाले " इंगळे कुटुंबाने दोन समाजात सामाजिक सौदार्य निर्माण केलेले आहे. बुद्ध हा कोण्या एका जातीचा नाही, कोण्या एका धर्माचा नाही तो सर्वांचा आहे हे या घटनेने अधोरेखित झालेले आहे.
चार बहिणींच्या दानातून उभी राहिली विहाराची कमान
या विहाराच्या बाहेर बनवण्यात आलेली दिमाखदार कमान ही चार बहिणींच्या दानातून उभी राहिलेली आहे. भेंडवडे सारख्या छोट्याशा गावात सामूहिक सहभागातून उभे राहिलेले बौध्द विहार हे केवळ धार्मिक विधींचे केंद्र न बनता कायदे, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन तसेच सामाजिक जनजागृतीचे केंद्र व्हावे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते बजरंग काळेबाग यांनी व्यक्त केली आहे. या बौद्ध विहाराच्या अनावरणाचा कार्यक्रम गावातील प्रथम नागरिक सरपंच लक्ष्मी जानकर यांच्या उपस्थितीत झाला.