Home > News Update > आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
X

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीच्या धाकावर मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज सुर्वेसह 10 ते 15 जणांनी बुधवारी (9 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास मुंबईतील गोरेगाव इथल्या ग्लोबल म्युझिक जंक्शन या कार्यालयात गोंधळ घालत अपहरण करुन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात आणलं. त्यानंतर तिथे शिवीगाळ आणि मारहाण करत स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षरी घेत करारनामा रद्द झाल्याचं लिहून घेतलं, असा आरोप फिर्यादी राजकुमार सिंह यांनी केला आहे. मुंबईतील वनराई पोलिसांत या प्रकरणी 10 ते 12 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

राजकुमार सिंह यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "आपण मनोज मिश्रा यांच्याबरोबर एका वर्षाचा करारनामा केला होता. मात्र मनोज मिश्राने पैसे परत न करता हा करारनामा जबरदस्तीने रद्द करण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर आपल्याला कार्यालयातून खेचून कारमध्ये बसवून प्रकाश सुर्वे यांच्या मुंबईतील दहिसर पूर्व इथल्या युनिवर्सल हायस्कूल जवळील कार्यालयात आणलं. यानंतर आपल्याकडून जबरदस्तीने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा याच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाला असं लिहून घेतलं." यानंतर पोलिसांनी संबंधित व्यावसायिकाची अपहरणकर्त्यांपासून सुटका केली. पीडित राजकुमारचे वकील सदानंद शेट्टी यांनी माहिती दिली की, हे संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचं आहे. राजकुमार सिंह यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक आणि आरोपी मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी साडेआठ कोटी रुपये दिले होते.

Updated : 10 Aug 2023 11:42 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top