अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल
X
अहमदनगर : अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह आठ ते दहा जनांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगासह इतर कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात. काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर शहरामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील वाद आता टोकाला जाताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्ष असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये अशा पद्धतीने सामना होत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसीतील आयटी पार्कला नुकतीच भेट दिली होती. मात्र, त्या ठिकाणी आयटी पार्क नसून फायनान्स कंपन्याच्या वसुली पथकाचे कॉल सेंटर असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. सोबतच अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार Sangram Arun Jagtap यांनी या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या युवकांचा अनेक महिन्यांचा पगारच दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.याचमुळे आमदार जगताप यांनी येथील काम करणाऱ्या महिलांना पुढे करून आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं काळे यांनी म्हटले आहे.
काळे यांनी कार्यालयात बळजबरीने प्रवेश करून येथील तक्रारदार महिलेचा हाथ पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यालयातील महिलांना दमदाटी केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात किरण काळे आणि इतर आठ ते दहा जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.