Covid-19 च्या लसीचा बूस्टर डोसबाबत आज निर्णय होण्याची शक्यता
X
नवी दिल्ली // काहीशा आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्याने पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन झाले सतर्क असून आता कोरोना व्हायरसविरुद्ध प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याची मागणी होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अंतर्गत विषय तज्ज्ञ समिती आज कोविड-19 बूस्टर डोसबाबत पहिली बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्डच्या बूस्टर डोसच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
सीरमचे म्हणणे आहे की, देशात सध्या कोविड लसीचा पुरेसा साठा आहे आणि नवीन कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे बूस्टर डोसची मागणी होत आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ही भारतातील पहिली लस उत्पादक कंपनी आहे जिने बूस्टर डोस म्हणून Covishield च्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. याबाबत एसईसीची बैठक आज दुपारी 12 वाजता सुरू होणार असल्याची माहिती आहे. अनेक तज्ज्ञांनी विशेषत: नवीन अत्यंत संसर्गजन्य COVID-19 चा व्हेरिएंट Omicron आढळून आल्यानंतर भारतात बूस्टर डोसची शिफारस केली. मात्र, सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान अलीकडेच भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने भारतातील कोविड-19 लसींच्या अतिरिक्त डोसबाबत एक बैठकही घेतली, मात्र या विषयावर कोणतेही एकमत होऊ शकले नाही.