Home > News Update > ठाण्यात होणार 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय- पालकमंत्री शिंदे

ठाण्यात होणार 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय- पालकमंत्री शिंदे

ठाण्यात होणार 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय- पालकमंत्री शिंदे
X

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन जिल्हावासियांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळावे, यासाठी प्रयत्न करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे. तसेच, न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी व आँको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार होणार आहे, त्यामुळे कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकारांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे.

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची सध्याची क्षमता ३०० खाटांची आहे. ठाणे व लगतच्या पालघर जिल्ह्यातील लाखो गोरगरीब रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून आहेत. परंतु, या दोन्ही जिल्ह्यांची वाढती लोकसंख्या आणि आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. तसेच, अनेक आधुनिक उपचार येथे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रस्ते अपघातात तातडीने उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांवर येथे उपचार करता येणे शक्य नसल्यामुळे त्यांना मुंबईला पाठवावे लागते. तातडीने उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा असे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय व्हावे, यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार हे ही याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने २२ सप्टेंबर रोजी जारी केला.

यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने वारंवार बैठका झाल्या. शिवसेना-भाजप युती सरकारमधील माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार सध्याच्या ३०० खाटांच्या जागी तिप्पट क्षमतेचे, म्हणजे ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्यात येणार आहे. दरम्यान ठाणेकरांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणीला न्याय दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले.

Updated : 23 Sept 2021 8:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top